पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेथे किंमत आहे" आता मोडक आणि गोडबोलेनी पण भर घातली, बापूराव अशा स्तुतीने शारून जात. म्हणजे ते स्तुतीप्रिय होते अशातला भाग नव्हता. पण त्याना बरं वाटत असे. विशेषत: सगळे थकले आहेत- हताश झाले आहेत, सारी परिस्थिती आतां आपल्यालाच हाताळायची आहे अशी 'सिच्युएशन्' असली की बापूरावाना अधिक स्फुरण चढे. आणि खरं म्हटलं तर ही 'पूर्ववैभव' सोसायटी, त्यांनी संपूर्णपणे स्वत:च्या हिंमतीवर उभी केली होती. बाकीची मंडळी होती, नाही असं नाही. पण भजन म्हणणारा मुख्य म्होरक्या असावा व बाकीच्यांनी नुसते 'जीऽजी रे जीऽजी' करत साथ द्यावी तशातला प्रकार होता. त्यामुळे सोसायटीची बिल्डिंग पुरी झाल्यावर आजूबाजूच्या परिसरात ती 'बापूरावांची सोसायटी' म्हणूनच ओळखली जायची. सोसायटीच्या बिल्डिंगचा पाया भरण्यापासून तो बिल्डिंग उभी राहीपर्यंत आणि अगदी अंगणात फुलंझाडं लावण्यापासून तो बॅडमिंग्टन कोर्ट आखण्यापर्यंत सगळ्याच कामात खरी मेहनत बापूरावांचीच होती. अनेक सामाजिक कार्यांशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या ओळखी खूप होत्या. एखादे काम हाती घेतल्यावर त्याच्या पूर्णतेपर्यंत पाठपुरावा करण्याची विलक्षण चिकाटी व जिद्द त्यांच्या अंगी होती आणि त्यापेक्षा आजकाल दुर्मिळ असलेला मोठा गुण त्यांच्या ठिकाणी होता तो म्हणजे निरपेक्ष बुद्धी. सोसायटीच्या लाखों रुपयांच्या उलाढालीतून त्यांनी एका पैशालाहि स्पर्श केला नव्हता किंवा साधा सुतळीचा तोडा स्वत:साठी घेतला नव्हता. अर्थात लोक म्हणायचे, नवरा बायको दोघेच दोघे, पैसा करायचा तरी कुणासाठी ? सर्वजण एकत्र राहायला आल्यानंतर मात्र बापूरावांनी जाणीवपूर्वक सोसायटीच्या कामातून आपले अंग काढून घेतले होते. आणि आपल्या सहकाऱ्यांवर बाकीची जबाबदारी सोपवून ते आपल्या आवडत्या वनवासी कल्याण केंद्राच्या कामात अधिकाधिक लक्ष घालू लागले. त्यासाठी त्यांना अधूनमधून बाहेरगांवी जावे लागे. ह्या सीतारामाचा उपद्रव व्हायला लागला त्या काळात ते असेच बाहेरगांवी होते आणि नुकतेच घरी परतले होते. त्यांची पत्नी शांताबाई नावाप्रमाणेच शांत बाई होती. आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने ती त्यांच्या कामात सहभागी होत असे. मात्र आपल्या नवऱ्याच्या सरळ, अतिसरळ स्वभावाचा त्याना कधीकधी राग येई. आपला नवरा जितक्या निरपेक्षपणे कामे करतो तशी इतर मंडळी नाहीत ह्याची त्यांना खंत वाटे, खेरीज आपल्या नवऱ्याच्या कामाची बूज इतर मंडळी काम संपल्यावर ठेवीत नाहीत ह्याचे त्यांना सखेद वाईट वाटे. म्हणून आतासुद्धां सगळी मंडळी आल्यावर त्यांना थोडासा रागच आला होता. म्हणजे आतां आपल्या नवऱ्याला पुन्हा सोसायटीच्या कामात पडावे लागणार तर ? चहा फराळाचे घेऊन त्या हॉलमध्ये आल्या तेव्हा चर्चा संपत आली होती व सगळी 'स्किम्' अगदी पक्की झाली होती.

∗∗∗

निखळलेलं मोरपीस / २७