पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५. 'बिनकण्याची माणसं'


 साठे, मोडक, गोडबोले आणि फाटक सर्वजण मिळून आलेले शांताबाईंनी बघितले. आज काहीतरी ह्यांच्याकडे महत्त्वाचे काम दिसतेय; त्याशिवाय फिरकायची नाहीत ही मंडळी, असा विचार करत त्यांनी सर्वांना बाहेरच्या हॉलमध्ये बसायला सांगितले. बेडरुममध्ये वाचत बसलेल्या बापूरावाना त्यानी सांगितले, तसे 'बापूराव अंगात झब्बा चढवित बाहेरच्या हॉलमध्ये आले. आपल्या नेहेमीच्या खड्या सुरात त्यानी विचारले,

 "हंs, बोला मंडळी, काय काम काढलत् ?

 'त्याचं असं आहे बापूराव' साठेंनी सुरवात केली.

 “ह्या सीतारामाचा उपद्रव हल्ली फार वाढलाय्. इतके दिवस आपल्या सोसायटीच्या बिल्डिंगसमोर नुसते मासणीचे वाटे विकत बसायचा तोंवर ठीक होतं. पण हळूहळू गोळ्या बिस्किटं विकूं लागला. समोरच असलेल्या शाळेच्या मुलांमुळे विक्री वाढायला लागली. धंदा वाढतोय् बघितल्यावर त्याची हांव पण वाढायला लागलीय्. दोन तीन दिवस झाले. आपल्या सोसायटीच्या कंपाऊंडला लागून एक दुकान बांधायला सुरवात केलीय्. एकदा दुकान बांधून झालं म्हणजे आपल्या सोसायटीवर ते चांगलंच आक्रमण ठरणार आहे. हे सगळं बांधकाम बेकायदेशीर आहे. तुम्ही गेले १५-२० दिवस बाहेरगांवी होतात.”

 "तुम्ही काय काय केलत ?"

 “आम्ही सर्व पुरुषमंडळी ऑफिसला गेल्यावर तो येतो. गवंडी वगैरे आणून काम करतो. बिल्डिंगमधल्या बायकांनी हटकलं तेव्हां अत्यंत अर्वाच्य अशा शिव्यांचा भडिमार त्याने केला. तशी त्या घाबरल्या."

 "म्युनिसिपालिटीत तक्रार दिलीत?"

 "हो, काल मी आणि मोडक रजा काढून म्युनिसिपालिटीच्या ऑफिसात गेलो. पुष्कळ खात्यांमधून फिरलो. अनेकांना भेटलो पण आमची कोणी दाद घेतली नाही. नुसती अडवाअडवी केली."

 "तुम्हीच लक्ष घातल्याशिवाय कांही जमायचं नाही बापूराव. तुमच्या शब्दाला

बिनकण्याची माणसं / २६