पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि वर थोडेसे पाणी घेतले.

 भाऊसाहेबांनी पुढे बोलायला सुरुवात केली. एक न्यायाधीश म्हणून माझे कर्तव्य संपलेले आहे. खरे पाहता ह्या खटल्यात निर्णयाचे काम अगदीच सोपे होते. कारण फिर्यादी पक्षाने जमा केलेला पुरावा बिनतोड आहे. कायद्याच्या मर्यादा, आरोप असलेल्या उच्चपदस्थ मंडळींनी बिनदिक्कतपणे ओलांडलेल्या आहेत. तेव्हा कायद्यात तरतूद असलेल्या कलमांप्रमाणे त्यांना दोषी धरणे हे अगदी सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे ही गोष्ट माझ्यासमोर खटला आला त्या क्षणापासूनच स्पष्ट होती. आता मी जो तुमच्यासमोर बोलतोय तो तुमच्यासारखाच एक सामान्य नागरिक म्हणून. ह्या खटल्यातून तथाकथित उच्चपदस्थ मंडळींची सुटका व्हावी, बिनशर्त मुक्तता व्हावी यासाठी माझ्यावर अनेक प्रकारे आणि अनेक व्यक्तींचे दडपण येत होते. मोह आणि प्रलोभने अनंत होती. अर्थात् उभ्या आयुष्यात ज्या गोष्टी आम्ही निग्रहाने टाळत आलो त्यांचा आतां आयुष्याच्या अखेरीला मोह पडेल हे सर्वथा असंभवनीय. फक्त काळजी होती ती, हा निकाल दिल्यानंतरच्या परिस्थितीची. काही वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती माझ्या दोन ज्येष्ठ सहकाऱ्यांवर आली होती. त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता निर्भयपणें रास्त निकाल दिले होते. आपल्या देशातील न्यायसंस्थेची प्रतिष्ठा वाढवलेली होती. पण हे 'निर्णय' उच्चपदस्थांना मानवणारे नव्हते, परिणाम इतकाच झाला की माझा सहकारी अचानक आपल्या बाल्कनीतून तोल जाऊन 'अपघाताने' खाली रस्त्यावर पडून गेला! आणि दुसरा मानसिकदृष्ट्या दुर्बल ठरून दूर केला गेला!! मला माझी स्वत:ची अशी परवड करून घ्यायची नाही. माझ्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना आधीच मी परदेशी पाठविलेले आहे. मला स्वत:ला पळून जाणे अशक्य नव्हते. पण तसे करणे भ्याडपणा दिसला असता. न्यायसंस्थेचीही प्रतिष्ठा गेली असती. मघा मी ज्या दोन गोळ्या घेतल्या त्या काही नेहमीच्या डोकेदुखीच्या नव्हत्या तर माझ्या जीविताचा अंत घडविणाऱ्या होत्या. माझ्या मरणाने तरी आजच्या भ्रष्टाचारी समाजजीवनाची भयानक अवस्था तुम्हां सर्वांच्या ध्यानी येईल आणि तुम्ही तुमची मरगळ आणि उदासीनता टाकून राष्ट्रहिताचा विचार राज्यकर्त्यांना करायला लावाल एवढी तरी किमान अपेक्षा मी करूं नये काय?"

 भाऊसाहेबांच्या एकेका शब्दासरशी लोक प्रक्षुब्ध होऊ लागले होते, त्यांनी आपले निर्वाणीचे शब्द उच्चारले तेव्हां त्यांच्या स्नेह्या-सोबत्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या खुर्चीकडे धाव घेतली; पण......पण सारे संपत आले होते....

 भाऊसाहेबांचा हा निर्णय कोणी कधीच अपेक्षिला नव्हता!

निखळलेलं मोरपीस / २५