पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "म्हणजे तू पण झोपली नव्हतीस ना?" भाऊसाहेब सुमतीबाईंकडे स्नेहार्द दृष्टीने पहात म्हणाले.

 "तुला कितीवेळा मी बजावलेले आहे. आमची कामे ही अशी. असा एखादा महत्त्वाचा खटला समोर असला की दिवसाच्या गडबडीत दोन्ही बाजूंचा शांतपणे, निःपक्षपातीपणाने विचारच करता येत नाही; म्हणून अशावेळी रात्री शांतपणे चिंतन होते. अशा वेळी माझी चिंता करत बसायचे नाही. आपले काम आंवरले की झोपून जायचे."

 कांही न बोलता सुमतीबाईंनी कॉफीचा कप पुढे केला, भाऊसाहेबांच्या मनात आलं, कशाला पुन्हां पुन्हां बजावायचं. आयुष्यात हिने आपल्या काळजीखेरीज दुसरं केलेच आहे काय? दोन वर्षांपूर्वी आपण हॉस्पिटलमध्ये होतो; तेव्हां रात्री ड्युटीला स्पेशल नर्स ठेवलेली होती. पण तिच्यावर भरवसा न ठेवतां रात्र रात्र हीच जागी असायची, खरं पहायला गेले तर ही सुमती केवढी बुद्धीवान आहे? मनात आणले असते तर चांगली वकील झाली असती, आणि कदाचित आपल्याच बेंचसमोर युक्तिवाद मांडत बसली असती; पण ते नाही; स्वतंत्र कर्तृत्व दाखवायची हौस कधी तिने दाखविलीच नाही. दुधात खडीसाखर विरघळून जावी तशी आपल्या संसारात पूर्णपणे विलीन झाली. आयुष्यभर आपल्यामागे सांवलीसारखी राहिली. आणि आता ह्यापुढे पुन्हा हिला बजावयाचा, समजावयाचा प्रश्न येतोच आहे कशाला? 'त्या' विचारासरशी भाऊसाहेब दचकले. छे, 'ती' कल्पनाच सहन होत नाही! पण.....

 भाऊसाहेब आरामखुर्चीत सावरुन बसले, जसे कांही त्यानी स्वत:च्या मनांतील द्वंद्वपण सावरले होते.

 "अग काल सुधीरची केबल आली होती."

 "आँऽऽ मग बोलला नाहीत ते."

 "अगं रात्री उशीरा आलो आणि कामाच्या गडबडीत राहून गेलं. "

 "काय म्हणतोय ? बरा आहे ना?"

 "तो छान आहे. पण छायाला बरं नाही. म्हणजे काळजी करण्यासारखं कांही नाही. कांही तरी 'गोड' आजार आहे."

 "अग बाई हो? छानच.”

 सुमतीबाईंची लागलीच कळी खुलली.

 "सुधीरने ताबडतोब तुला बोलावलंय. छायाला त्रास होतोय, तिचा थिसिस् जवळजवळ पुरा होत आलाय, तेव्हां त्यांना आता तुझी फार गरज आहे. तुला न विचारताच मी तुझे शनिवारचे विमानाचे बुकिंग केले आहे."

निकाल / २२