पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "म्हणजे तुम्ही येणार नाही?" सुमतीबाईनी काळजीच्या स्वरात विचारले.

 'अगं तू पुढे हो. एवढे खटल्याचे काम आटोपले की मी सरसाहेबांची परवानगी घेतो आणि निघतोच."

 "बघा बाई, मला कांही तुमचं खरं वाटत नाही."

 पण सुमतीबाईंचे बोलणे तेवढ्यावरच थांबले. बाहेर कोणी मंडळी आल्याचे रामजी सांगत आला तेव्हां त्या अभ्यासिकेतून बाहेर पडल्या. भाऊसाहेबांना कोण मंडळी आली असावीत आणि कशासाठी ह्याची पूर्ण कल्पना होती. त्यांनी जरा रागानेच रामजीला विचारले.

 "कोणाला भेटायला मला आवडत नाही, तुला माहीत आहे ना?"

 "होय साहेब.... पण मंडळी ऐकेचनात."

 "माझ्यासाठी कांहीतरी जहागीर वगैरे घेऊन आले असतील ना? आणि तुझ्यासाठी एखादा चांदीचा तोडा-बिडा."

 "होय साहेब." साहेबांनी अचूक ओळखले म्हणून रामजीला हसू आले." ही मंडळी त्यातलीच वाटतात. त्यांची उगाच थोडी समजूत काढाया मी आत आलो. त्यांना आतां कसं घालवायचं ते ठावं हाय मला. कमिशनरसाहेबांनाच फोन करतो म्हटल्यावर चटदिशी जातील."

 भाऊसाहेबांनी अभ्यासिकेचे दार लावून घेतले. त्यांचे मन विषण्ण झाले. आजवर त्यांच्यापुढे आलेले खटले वेगळे आणि आजचा वेगळा. आजवरच्या खटल्यात जास्तीतजास्त चार-दोन मंडळींचे हितसंबंध गुंतलेले असत. पण आताचा मामला वेगळा होता. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरच, झांगोजीरावांवर आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप होता- सरकारी यंत्रणेचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करुन, अमर्याद लांचलुचपत केल्याबद्दल कांही जागरुक आणि धाडसी समाजसेवकांनी न्यायालयात धाव घेतली होती. राज्याच्या सत्ताधीशांविरुद्ध हजारो लाखो लोकांनी केलेली ती कैफियत होती. जुलुमी, मग्रूर आणि बेमुर्वतखोर अशा सत्तांधांना कायद्याच लगाम घालायलाच हवा होता. हो! केवळ कायद्याचाच. कारण नीतीमत्ता, चाड या साऱ्या गोष्टी त्यांनी केव्हांच गुंडाळून ठेवल्या होत्या. भाऊसाहेबांना स्वत:चे नवल वाटले. अत्यन्त निःपक्षपातीपणे विचार करणारा म्हणून नावाजलेला आपल्यासारखा जेष्ठ न्यायाधीश इतका विकारवश कसा झाला.?

 पण न्यायाधीश असले तरी देशाचे ते एक सुजाण नागरिक पण होते. कायद्याच्या चौकटीत हातपाय बांधले गेले असले तरी सामान्य देशप्रेमी माणसाप्रमाणे त्यांचे मन पण

निखळलेलं मोरपीस / २३