पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४. निकाल


 रामजी अभ्यासिकेत सकाळचे टपाल घेऊन आला तेव्हां भाऊसाहेब आरामखुर्चीत रेलून बसलेले त्याला दिसले. थोड्याच वेळापूर्वी त्याने बनवून ठेवलेला चहा तसाच होता आणि त्यावर आता जाडसर साय धरली होती. भाऊसाहेब विचारमग्न होते. त्यांची नजर कोठेतरी शून्यात होती. त्या नजरेने अर्थातच रामजीच्या येण्याची दखल घेतलेली नव्हती. तेव्हा रामजी म्हणाला,

 'साहेब'

 "आ"

 "नाय म्हटलं, सकाळची च्या तशीच थंड पडली हाय्. आता दुसरी बनवून आणतो."

 "नको, नको, आज चहा नकोसा वाटतोय, बाईसाहेबांना सांग, चांगली स्ट्राँग कॉफी बनवून इकडेच घेऊन या."

 हे नवलच होते. भाऊसाहेबांना चहा अत्यंत प्रिय होता. सकाळच्या दोन-तीन प्रहरात तीन चार वेळा तरी ते चहा घेत. रामजीच्या मनात आलं, इतर बंगल्यांतून कचाकच बाटल्या फुटत्यात. पण आपल्या साहेबांनी अमृतकोकमखेरीज दुसरं रंगीत पाणी कधी बघितलं नसेल. हा झांगोजीरावाचा खटला केव्हा पुरा होतोय, कुणास ठाऊक? पण आपल्या साहेबाचे किती रक्त आटवतोय! एकसारखे निरोप काय, फोनवरुन धमक्या काय---

 विचार करत करत रामजी गेला. साहेबावर त्याची फार फार भक्ती होती.

 थोड्याच वेळाने सुमतीबाई कॉफीचा ट्रे घेऊन आल्या. वास्तविक रामजीखेरीज अभ्यासिकेत कोणीच आलेले साहेबाना आवडत नसे. आज ज्याअर्थी आपणहून बोलावलं आहे त्याअर्थी जिवाची तगमग, प्रक्षोभ वाढलेला दिसतोय, कॉफी कपात ओततां ओततां त्या म्हणाल्या.

 "काल रात्रभर जागेच होता ना?"

 "तुला काय माहीत?"

 "अभ्यासिकेत दिवा दिसत होता ना!"

निखळलेलं मोरपीस / २१