पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एअर कंडिशन्ड् खोलीत बसूनसुद्धा सर्व हकिगत सांगताना तात्यांना घाम फुटला होता. बबनची कर्मकहाणी सांगताना इकडे तात्यांचा ऊर धपापत होता. तर तिकडे दौलत शेटला मनावरचे मणामणाचे ओझे उतरल्यासारखे वाटत होते. तात्यांची हकिगत संपल्यावर लागलीच तेथूनच दौलत शेटने एस्. टी. ऑफीसला फोन लावला. कंट्रोलरसाहेब दौलतशेटचा फोन म्हटल्यावर हादरले.

 "हे बघा. ते बबन कुलकर्णीचे प्रकरण आहे ना ते ताबडतोब हश्अप् करायचे."

 "आँ, पण साहेब त्याचा कबुलीजबाब झालाय. रेकॉर्डवर नोंद झालीय."

  "कंट्रोलरसाहेब, तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढूं कां ?"

 "नाही, नाही, साहेब. तसं नाही. पण..."

 "हे बघा. तुम्हाला गावांत नीट नोकरी करायची आहे. तुमच्या मुलाला जूनमध्ये पॉलिटेक्निकमध्ये अॅडमिशन घ्यायचीय ना? मग नीट काय सांगतो ते ऐका. अजून बबनच्या प्रकरणाचा बभ्रा झाला नाही. तेवढ्यातच मिटवून टाकायचंय. कोणाला अजिबात कळता कामा नये. बबनला कालचा आणि आजचा दिवस रजेवर दाखवा. सगळे पेपर्स घेऊन संध्याकाळी माझ्याकडे या. म्हणजे कसं निस्तरायचं ते नीटपणे सांगता येईल. समजलात? उद्यापासून बबन कामावर हजर होईल. त्याला कोणताही त्रास होता कामा नये. माझा माणूस समजायचा. कळलं ना मी काय म्हणतोय ते?"

 "होय साहेब.” त्या बाजूला कंट्रोलर बहुधा घामच पुसत असावा. दौलतशेटचा आवाज भलताच करडा होता.

 "झालं ना तात्या काम तुमचे. आतां आम्हांला तुमचे आशीर्वाद पाहिजेत.” तात्यांनी आशीर्वाद दिला.

 तात्या घरी परतले. दवाखान्यांतून परततांना झाली होती त्यापेक्षा त्यांची पावले आज अधिक जङ-झाली होती.

 दुसरे दिवशी बबन कामावर रूजूं झाला. संध्याकाळी खुशीत घरी आला. सगळा दिवस छान गेला होता. जसं काही घडलंच नव्हतं. आनंदाने तात्यांना हाका मारीत सांगायला माडीवर गेला. पण... तात्यांना त्याची हांक ऐकूं जात नव्हती? कारण.......

पराभूत / २०