पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चालली नाही. आपल्याला खरं म्हणजे किती मानतो तो. मराठे मास्तरांची सिनिऑरिटी डावलून आपल्याला हेडमास्तर करायला निघाला तेव्हा करडेपणाने आपणच त्याला समजावले. अशा एक ना अनेक गोष्टी तात्यांना आठवल्या. काय म्हणेल हा दौलत शेट आपल्याला? आपल्याला हिणवेल? पण नाही. तसा तो दिलदार आहे. त्याचे मार्ग काही असोत आणि आपल्याला तरी दुसरा मार्गच कोठे राहिलाय? तात्या बंगल्यासमोरच्या बगिचात विचारमग्न उभे होते. तेवढ्यात तिकडून हरि आला. त्यांचा जुना विद्यार्थी. "तात्या, इकडे कुठे वाट चुकलात? दौलतशेटचे अभिनंदन करायला काय?"

 “आँ, होय." तात्यांना आपसूकच निमित्त मिळाले. "अरे बाबा एवढी गर्दी. मी कसा पोचणार तुझ्या शेटपर्यंत?"

 "तुमी काय बी फिकीर करू नका. मी हाय ना. मी करतो समदी वेवस्था. फकस्त तुमी एक चिट्टी द्या."

 तात्या मास्तरांची चिट्टी वाचून दौलतशेट चरकला. आमचा हा रामशास्त्री काही नुसतं अभिनंदन करायला आला नसेल? काही तरी सुनवायलाच आला असेल. आपल्याला बुवा जगात पैसे घेणारीच माणसं आवडतात. त्यांनी घेतले. आपण दिले. त्यांनी दिले. आपण घेतले. पण ही तात्यांसारखी माणसं म्हणजे भारी अडचणीची. आपण खायची नाहीत आणि दुसऱ्याला खाऊं द्यायची नाहीत. वर काहीतरी तत्त्वज्ञान सांगत राहतील. सांगावं कां आता वेळ नाही म्हणून. तेवढ्यात दौलतशेटच्या मनात एक कल्पना सळसळून गेली. तात्यांना आपल्याकडे पाठवायची त्या कमळाबाईची तर मसलत नसेल? कमळाबाईंच्या आठवणीनं नाही म्हटलं तरी दौलत शेटचं तोंड जरा कडू झालंच. कालचा प्रकार जरा जास्तीचाच झाला. कमळाबाई मुलींच्या वसतिगृहाची व्यवस्थापिका. आपण संस्थेचे अध्यक्ष म्हणून राऊंड घेतला. काल कमळाबाईंशी आपण जरा वाजवीपेक्षा जास्तीच सलगी केली.... ती बाई तर बिथरली नसेल ना? तिनेच तर तात्यांना सगळं सांगून पाठवलं नसेल? एरवी सगळं दडपलं असतं. पण आता मंत्रिपद तोंडावर आलंय्. मध्येच काही भानगड उपटायला नको. काय असेल तर आतांच त्याचा 'बंदोबस्त' केलेला बरा. दौलत शेटने तात्यांना आत घेऊन यायला हरीला सांगितले. तात्या हॉलमध्ये आले. भोवतालची गर्दी पाहून थोडेसे हिरमुसलेच. प्रश्नार्थकपणे त्यांनी दौलत शेटकडे बघितले. दौलतशेट समजला. चार लोकांत तात्यांना बोलायचे नाही. म्हणजे आपला अंदाज बरोबर म्हणायचा. हा रामशास्त्री काही अभिनंदनासाठी आला नाही. कमळाबाईंचंच काम दिसतंय् !

  "चला तात्या, आपण आतल्या खोलीत बसूं. मंडळी तुम्ही थोडा वेळ बसा. आम्ही गुरुजींशी बोलून येतो."

निखळलेलं मोरपीस / १९