पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छे, यांचा काही उपयोग नाही. सगळी मंडळी नुसत्या साधनशुचितेच्या गप्पा मारतील. आपल्याला माहीत असलेले आणि आपणच सांगितलेले तत्त्वज्ञान आपल्याला शिकवतील. मग भोगू दे का बबन आपल्या कर्माची फळे? पण मग त्या बिचाऱ्या सुनंदाचे आणि त्याच्या तीन निष्पाप मुलींचे काय होईल? छे, काहीतरी केलेच पाहिजे. आपली तत्त्वे, आपले आदर्श आपल्याबरोबर स्मशानात जावोत. त्याची बबनला अडचण होता कामा नये. त्याची झळ सुनंदाला आणि माझ्या तीन नातींना पोहोचता कामा नये. काही करून बबन सुटला पाहिजे. नुसता नाही. त्याच्या अफरातफरीच्या प्रकरणाबद्दल जगाला काही कळता कामा नये. जसं काही घडलंच नव्हतं.

∗∗∗


 दख्खनदौलत' बंगल्यात दौलतशेटचा दरबार भरला होता. अनेक मंडळी अनेक गाऱ्हाणी घेऊन आलेली. शेटजींचा मुक्काम दोनच दिवस बंगल्यावर होता. लागलीच त्यांना मुंबईला जायचं होतं. नव्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळणार हे काही आता गुपित राहिले नव्हते. म्हणून तर आज बंगल्याकडे नुसती माणसांची रीघ लागली होती. कोणाला इरिगेशन पंप पाह्यजे होते. कोणाला नव्या औद्योगिक वसाहतीत प्लॉट पाहिजे होता. तर कोणाला पेट्रोलपंपासाठी लायसन्स पाहिजे होते. दौलतशेट होतेच तसे लोकप्रिय. जिल्ह्यासाठी त्यांनी खूपच परिश्रम घेतले होते. जिल्ह्यातील सर्व बेकारी नष्ट करण्याचा त्यांनी चंग बांधला होता. नवनवीन उद्योगधंदे सुरू करण्याच्या त्यांच्या योजना होत्या. आता मंत्रीपद हाती आल्यावर तर काय सारे अधिकारच ताब्यात येणार होते. आता या माणसात थोडे दोष होते, पण त्याच्याशी काय करायचेय्. नुसत्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या लोकांच्या हातून काही होत नाही. त्याला दौलतशेटसारखीच धडाडी पाहिजे.

 बंगल्यासमोरची गर्दी पाहून तात्या हबकलेच. आता या गर्दीत आपला कसा काय निभाव लागणार या काळजीने त्यांना भेडसावले. का आपण आपल्या तत्त्वापासून रेसभरही मागे सरू नये म्हणून परमेश्वरानेच ही गर्दीची भिंत आपल्यासमोर उभी केलीय? आपण? आणि दौलतशेटच्या दाराशी वशिला लावायला? आणि तोसुद्धा आपल्या अपराधी मुलासाठी? आणि दौलतशेट कोण? तर ज्याला आपण शाळेच्या कामात ढवळाढवळ सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले तो ? शाळेच्या इन्स्पेक्शननंतरचे ताशेरे इन्स्पेक्टरला दम भरून त्याने बदलायला सांगितले तेव्हा साऱ्या गोष्टी नियमानुसारच झाल्या पाहिजेत म्हणून आपणच ना त्याला खडसावले ? खरं म्हणजे दौलतशेट आपला एकेकाळचा विद्यार्थी. मराठी सहा-सात यत्तेनंतर त्याची बुद्धी शाळेत

पराभूत / १८