पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्टोअरकीपर होता. कोणाच्या तरी नादाने म्हणा पण एस्. टी. स्टोअरच्या मालखरेदीच्या कामात अफरातफर केल्याच्या प्रकरणात सापडला. खरं तर त्याची चूक नव्हती. खरेदीच्या कागदपत्रांत कोणीतरी खाडाखोड करून बबनची सही घेतली होती. तो असा काही कचाट्यात सापडला की वरीष्ठांपुढे सर्व काही त्याने घाबरून कबूल केलेन्. आता चौकशी होईल. पोलिसात जाईल. गुन्हा नक्कीच शाबूत होईल. मग कोर्ट. शिक्षा. दंड नि कदाचित् तुरुंगवाससुद्धा. नोकरी तर जाईलच, पुन्हा गावभर चर्चा. पुन्हा नोकरी मिळणार नाही. कदाचित् वृत्तपत्रांतून पण येईल. राष्ट्रपती पदकाचा सन्मान मिळालेले आदर्श शिक्षक आणि समाजसेवक श्री. तात्या कुलकर्णीचा मुलगा पैसे खाल्ल्याच्या आरोपावरून तुरुंगात. तात्यांच्या डोळ्यासमोर सारी द्दष्यं चित्रपटासारखी पटापट सरकून गेली. बबनशी त्यांनी बोलायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्या कुशीत शिरून मुसमुसून रडण्यापलीकडे त्याला काहीच जमले नाही. बिचारी सुनंदा गलबलून गेली. तिन्ही मुली आपले बाबा रडतात हे बघून कावऱ्याबावऱ्या झाल्या.

 काय बरे करावे आता? तात्या विचारात पडले. त्या अभ्यंकर वकिलांकडे जावे का? वाटेल तशा अवघड केसेसमधून त्यांनी अनेकांना सोडीवले आहे. ते बबनला सोडवितील? तात्यांच्या मनात क्षणभर आशा पालविली. पण नाही सुटला तर? आणि सुटला तरी काय फरक पडतोय? एकदा माथ्यावर कलंक बसला की पुन्हा थोडीच त्याला नोकरी मिळणार आहे? आणि उजळ माथ्याने त्याला नंतर हिंडता येईल? आणि अशा या राक्षसी महागाईच्या दिवसात सुनंदा आणि तीन मुलींना घेऊन काय करेल बिचारा? तात्यांच्या घशात आवंढा आला. आपल्या दुखण्याच्या आठवणीबरोबर त्यांनी कसाबसा आवंढा गिळला. अभ्यंकर वकिलाकडे जायचे असा विचार करून तात्यांनी खुंटीवरचा कोट काढण्यासाठी हात वर केले पण पुन्हा झटक्यासरशी हात खाली घेतले. त्यांच्या डोळ्यासमोर अभ्यंकर वकिलांचा उग्र चेहरा दिसू लागला. त्यांचा चेहरा, आपले घारे डोळे विस्फारत बोलू लागला, 'तात्या, अहो तुम्ही मला बबनची केस हातात घ्यायला सांगताय ? अहो, तुम्ही जगाला आदर्श शिकविणारे. अपराध घडला की त्याचे शासन मिळालेच पाहिजे असंच ना तुम्ही म्हणायचेत ? मागे मी जोशी मास्तरांची केस हातात घेतली तेव्हा तुम्हीच ना मला जोरदार विरोध केलात? त्यावेळी तुम्ही काय म्हणाला होतात, "जोशी मास्तरांनी शिक्षक क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे पांच वर्षांचे हिशेब पुरे केले नाहीत. शिक्षकांची जमा केलेली रक्कम जमा केली नाही, तेव्हा तुम्ही त्यांना अजिबात पाठीशी घालू नका; आणि आता बबनने धडधडीत गुन्हा कबूल केलेला असताना तुम्हीच त्याला पाठीशी घालायला सांगताय् ? केवळ "तुमचा तो मुलगा म्हणून?” हताशपणे तात्यांनी कोट पुन्हा खुंटीवर टांगून ठेवला. काय करावे? कोणाकडे जावे? भाई शेटे, पुराणिक गुरुजी अनेक नावे तात्यांच्या डोळ्यांसमोरून सरकली. पण

निखळलेलं मोरपीस / १७