पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३. पराभूत


 तात्या मास्तर दवाखान्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचे पाय जड झाले होते. डॉक्टरांनी सांगीतलेले सगळे ऐकायचे म्हणजे किमान कांही सहस्त्र रूपयांना फटका. बरं ऑपरेशन् करून तरी संपूर्णपणे बरे होऊ याची खात्री डॉक्टर देत नाहीतच. म्हणे हा रोग असा आहे की, घशातील गांठी ऑपरेशनने काढल्या तरी पुन्हां शरीरात कोठे उद्भवणार नाहीत ह्याची ग्वाही देता येत नाही. जानकी गेली. तिच्यामागे दहा वर्षे आपण जगलो. एकुलता एक मुलगा बबनचे दोहोचे चार हात झालेले बघितले. त्याच्या ओढग्रस्तीच्या संसाराला होईल तितकी मदत केली. आता पदरात तीन मुली आणि एस्. टी. मधील नोकरी. त्याची अगदी फरपट होतेय, पण आता आपण काय करणार! आयुष्य सगळे आदर्शवादाची जोपासना करण्यात गेलं. इतरांसारखे चार पैसे गाठीला बांधून राहाणं आपल्याला कधी जमलंच नाही. गरीब, अनाथ विद्यार्थ्यांना जमेल तितकी मदत करत बसलो. विनामोबदला शिकविलं. आपण व्यवहारी वृत्तीने राहिलो असतो तर आता बबनच्या संसाराला नसती कां मदत झाली? आता आपल्या दुखण्यासाठी आजारीपणात बबन बिचारा कुठले पैसे खर्च करील? तेव्हा आता हॉस्पिटल, तपासण्या, एक्स रे वगैरे फंदात पडाच कशाला? डॉक्टर म्हणतात हळूहळू गिळता येणे बंद होईल, बोलता येणे कठीण होईल. हळूहळू संपूर्ण घसा बंद होईल. सर्व शरीरभर रोग पसरेल आणि शेवटी एक दिवस... भोग आपले. असूं देत. पण निदान त्यासाठी पैशाची तरी फोडणी नको जायला. यातले सुनंदा - बबनला कांहीच सांगता कामा नये. दोघं बिचारी हादरून जातील. म्हणून तर शंका येताच हा अनोळखी डॉक्टर गांठला. डॉ. विश्वासकडे जायची सोयच नव्हती. आपला आवडता विद्यार्थी. आपल्याला खूप मानतो. त्याने तपासणीचे पैसे घेतले नसते, पण औषधे, इंजेक्शन्स् आणि मग मुंबईत गेल्यावरच्या इतर खर्चाचे काय ? तेव्हा सुनंदा - बबनला कांहीच कळता कामा नये. कळेल तेव्हा कळेल. असा विचार मनाशी घोळवत तात्या घरी आले.

∗∗∗


 पण घरी तात्यांनाच हादरा बसायचा होता. बबन सस्पेंड झाला होता.

पराभूत / १६