पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तिच्या डोळ्यांत तरळणारे अश्रू बघून मी मुकाट्यानं हात पुढे केला आणि गुलाबी खड्याची अंगठी बोटात घालून घेतली.

∗∗∗

 मद्रास मेल मुंबईकडे धावत होती, त्याहून अधिक वेगानं माझं मन सुमतीकडं धाव घेत होतं. इतकी वर्षं तिच्यावर केलेल्या अन्यायाचं परिमार्जन आता मला करायचं होतं. तिच्यामध्ये सतत ललितेला शोधण्याची चूक मी आजवर करीत आलो होतो. आता मी शापमुक्त झालो होतो. स्वतःलाच विनाकारण एका अनामिक शापात मी गुंतवून घेतलं होतं. जी ललिता माझ्या अंतर्मनात खोलवर रुतून बसली होती, तिथं आता फक्त सुमती राहणार होती.

 सुमती मला फक्त सुमती म्हणूनच आता बघायची होती. बंधमुक्त विहंगासारखं माझं मन माझ्या मुंबईच्या घरट्याकडे धावत होतं. रूळ बदलल्यावर गाडीचा खडखडाट होतोच. तेवढाच मुंबईकडे धावणाऱ्या मद्रास मेलचा खडखडाट माझ्या लेखी होता.

 बाकी मन कसं शांत, स्वच्छ झालं होतं.

निखळलेलं मोरपीस / १६०