पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सकाळी केव्हा तरी मला जाग आली. समोरच्या कांचेच्या खिडकीतून वारा येत होता. रात्रीत केव्हा तरी ललितानं माझ्या अंगावर शाल टाकली होती. मला आठवलं की सकाळी उठून गोल्डन बीचवर जायचं आम्ही ठरविलं होतं. मी तडकाफडकी उठलो. ललिता बहुधा बाथरूममध्ये असावी. शॉवरचा आवाज येत होता. मी वॉश बेसिनवर तोंडावर पाण्याचे सपकारे मारले. खूप बरं वाटलं, घाईघाईत अंगावर कपडे चढविले. माझी छोटी ब्रीफकेस शोधली, एवढ्यात ललिता आली.

 "हे काय ? निघालास काय तू?"

 मी नुसतीच मान हलविली, खरं तर ललिता बाथरूममधून बाहेर यायच्या आतच सटकायचा माझा विचार होता. ललिता काय ते समजली, खिन्नपणाने म्हणाली,

 "मला माहीत आहे, आता तू कधीच मला भेटणार नाहीस. होय ना?"

  "छे, छे तसं काही नाही; अजून पुष्कळ खरेदी करायची आहे म्हणून लवकरच निघतो झालं."

 “कशाला उगीच मला फसवतोस? आणि स्वत:लाही? बरं, चहा तरी घेणार का?"

 "नको, नको, मला हँग ओव्हर आल्यासारखा वाटतोय्. चहाने आणखीनच ढवळेल. निघतो मी आता."

 "मला माहीत आहे, आता कितीही आग्रह केला तरी तू आत्ता थांबणार नाहीस, बरं तुला अडविण्याचा हक्कपण मी गमावून बसलेय. फक्त माझा तिरस्कार कधी करू नकोस."

 बोलता बोलता ललितानं मला घट्ट मिठी मारली. माझ्या कपाळाचं हलकेच चुंबन घेतलं. मी पण तिला हलकंसं थोपटल्यासारखं केलं आणि निघालो. दारापाशी पोचतो तो पुन्हा ललिता काही तरी आठवल्यासारखं करून 'थांब' म्हणाली. मी प्रश्नार्थक चेहरा करून उभा होतो. तेवढ्यात ती बेडरूममध्ये जाऊन आली. तिच्या हातामध्ये कालच्याच साडीचं पॅकेट होतं. दोन हजाराची साडी? मी हात एकदम मागे घेतले. तेव्हा ती म्हणाली, "प्लीज आता नाही म्हणू नकोस. काल आपण खूप बोललो. बरं वाटलं. पहाटे उठून तुझ्याकडे पहात मी बराच वेळ रडत होते. आयुष्यात इतकी समाधानाने मी प्रथमच रडले. आता आपण आयुष्यात पुन्हा कधीच भेटणार नाही. निदान तुला तरी नक्कीच मला भेटावंसं वाटणार नाही. तेव्हा माझी आठवण म्हणून ही साडी तुझ्या बायकोसाठी ठेव आणि ही अंगठी माझ्या समाधानासाठी बोटात घाल."

निखळलेलं मोरपीस / १५९