पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अविनाश टिळक मूळ सांगलीकर. मुंबईला रिझर्व्ह बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या श्री. अविनाश टिळक यांच्या हातावर साहित्यरेषा अमटली ती वयाची पन्नाशी जवळ येऊन ठेपल्यावर! कै. पु. भा. भावे कथा-स्पर्धा, दै. लोकसत्ता ग्रंथ परीक्षण स्पर्धा, के. सी. डी. देशमुख निबंध स्पर्धा अशा स्पर्धामधून पारितोषिके मिळवणाऱ्या टिळकांच्या कथा 'सुगंध', 'तरुण भारत (मुंबई), 'लोकप्रभा', 'दैवज्ञश्री', 'विशाल विटा', 'केसरी', 'आरती', 'स्वप्ना' अशा अनेक दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. संगीत, क्रिकेट, कॅरम, ब्रिज, ट्रेकिंग अशा विविध विषयात रुचि असणाऱ्या टिळकांचे स्फुट लेखन दै. महाराष्ट्र टाईम्स्, लोकसत्ता, लोकमत, सकाळ, पुढारी, केसरी, तरुणभारत आदी वृत्तपत्रांमधून विपुल प्रमाणात प्रसिद्ध. 'आधारवड' हा त्यांचा १९९४साली प्रसिद्ध झालेला पहिला चरित्र - ग्रंथ. ज्येष्ठ समाजसेवक श्री. दादासाहेब ताटके यांच्या विविधांगी समाजकार्यास आणि त्यागमय जीवनास अत्यंत ओघवत्या भाषेत टिळकांनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. ३५ वर्षे रिझर्व्ह बँकेत नोकरी करुन श्री. टिळक १९९६च्या अक्षय तृतीयेला सांगलीत स्थायिक झाले. सांगली नगरीच्या अतीव प्रेमापोटी सतत ४-५ वर्षे अखंड परिश्रम करुन सांगलीच्या २००व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी 'सांगली आणि सांगलीकर' हा मौलिक ग्रंथ २५ मार्च २००१ रोजी प्रकाशित केला. या पुस्तकाचे वाचकांनी उत्स्फूर्त स्वागत केलेच, पण अनेक विद्वज्जनांनी महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाचा गौरव केला. अविनाश टिळक यांना सांस्कृतिक, सामाजिक कामाचीही खूप ओढ असते. नोकरी काळात डोंबिवलीत वास्तव्य असताना, डोंबिवलीवासी रिझर्व्ह बँक कर्मचाऱ्यांची 'स्नेहवर्धिनी' ही सांस्कृतिक संघटना उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. रिझर्व्ह बँक महाराष्ट्र वाङमय मंडळाचे ते पदाधिकारी होते. सांगलीत स्थायिक झाल्यापासून, सांगली (जिल्हा) नगरवाचनालय, अनाथ विद्यार्थी सहाय्यक मंडळ, वादे सिनेसंगीत क्लब, संस्कारभारती आदी संस्थांबरोबर पदाधिकारी म्हणून ते संबंधित आहेत. 'निखळलेले मोरपीस' हा श्री. अविनाश टिळक यांचा कथासंग्रह असा पहिलाच. त्यामध्ये दिवाळी अंकांमधून गेल्या १५ वर्षांमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या २१ कथांचा समावेश आहे.