पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंगापूरच्या एका टूरमध्ये माझं शरीर पहिल्यांदा मलीन झालं, तेव्हा मी खूप रडले, भेकले, पण एक तर मी सर्वस्वी परक्या मुलुखात होते आणि ज्यानं भडकून उठायला हवं त्या माझ्या नवऱ्याच्याच संमतीनं सगळं चाललेलं. आता समर्थन करण्यात काही अर्थ नाही, पण जीव देण्याची वेळ तेवढीच आणि तीच होती. पुढचं सारं आयुष्य जिवाचे चोचले पुरविण्यातच गेलं."

 “ललिता, या साऱ्या प्रकारात तुला माझी कधी आठवण आली नाही?"

 "खूप आली; खूप वेळा आली. सिंगापूरच्या त्या प्रकारात तर फार आली. कदाचित तूच मला त्यावेळी सावरू शकला असतास!"

 "कसं शक्य होतं? एक तर तुला तुझा नवरा होता. बरं, आर्थिकदृष्ट्या मी अगदीच फाटका; सामाजिकदृष्ट्या नगण्य. मग कोणत्याही बरोबरीच्या नात्यानं मला तुम्ही सामावून घेतलं नसतंत.”

 "तेही खरंच म्हणा. पण मला त्या वेळेला तुझी खूप आठवण आली आणि तुझ्या प्रेमाची मला त्यावेळी खूप गरजही होती. तू माझा नुसताच प्रियकर नव्हतास, त्याहून चांगला मित्र होतास ह्याची मला तेव्हाही खात्री होती; आणि आज तीस वर्षांच्या गॅपनंतरसुद्धा माझी तीच भावना आहे. म्हणून तर आज मी इतकी बोलले. अशी आजवर कुणाशीही बोलले नव्हते."

 भावनाविवश होऊन ललिता माझ्या शेजारी येऊन बसली. माझ्या मांडीवर डोके ठेवून पडली; डोळे मिटून झोपली. व्हिस्कीचा अंमल तिच्यावर चांगलाच चढला होता. मी दोन-तीनच पेग घेतले पण ती बाटलीच्या बाटली फस्त करीत होती. तिला मी तशीच पडू दिली. शेजारीच पडलेली परदेशी उंची सिगारेट शिलगावली; धुरांची वलयं सोडत विचार करीत बसलो. बराच वेळ गेला. ललिता गाढ झोपून गेली होती. मांडीवरील तिचं मस्तक आता जड वाटायला लागलं होतं. मांडी अवघडून गेल्यावर तिला उठविण्याचा प्रयत्न न करता मी जवळच्याच सोफ्यावरची एक उशी ओढली आणि हलकेच मांडीवरील तिचं मस्तक त्या उशीवर ठेवलं. मी जड पायानं उठलो. समोरच्या ऐसपैस सोफ्यावर अंग पसरून पडलो. सिगारेट ओढायची मला तशी सवय नव्हती. पण झोप येत नव्हती म्हणून ओढत बसलो. समोर माझी लाडकी ललिता ऐसपैस पडली होती. मी काही करू शकलो असतो, पण काहीही ‘करायची' माझी इच्छा नव्हती. माझ्या मनात वर्षानुवर्षे जपलेली ललिता वेगळी होती आणि ही समोर पडलेली ललिता सर्वस्वी अनोळखी, अपरिचित होती. कुऱ्हाड सोन्याची असली तरी मला त्या सोन्याची अजिबात हाव नव्हती. विचार करता-करता केव्हा तरी मला झोप लागली.

निखळलेलं मोरपीस / १५८