पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "ललिता, मुलांचं काय?"

 "ते आणखी एक दुर्दैव." दीर्घ सुस्कारा टाकून ती म्हणाली, 'सुदैवानं म्हण किंवा दुर्दैवानं म्हण. दोन्ही वेळेला मिसकॅरेज झालं. आता असं वाटतंय की आम्हा दोघांच्या रक्तामांसाचा जीव आमच्यामध्ये असता तर त्या मधल्या दुव्यामुळे तरी दिलीप मला दुरावला नसता.'

 "मग तू आई-पप्पांना का नाही बोलावून घेतलंस?'

 “कशाला? माझ्या अब्रूची लक्तरं बघायला? दिलीप जसजसा घसरायला लागला तसतसा आमच्याकडील सर्वांचा येण्याचा राबताही कमी झाला. माझंही महाराष्ट्रातील येणं-जाणं कमी झालं. खरं म्हणायचं तर मीच कमी केलं. उगाच नको ती चर्चा व्हायची. आई-पप्पा दोघंही गेले. त्यामुळे अलीकडे तर अजिबातच गेले नाही. आता कसलंच बंधन माझ्यावर उरलं नाही. ना नवऱ्याचं, ना मुलांचं, ना आई-वडिलांचं. आता दिलीपच्या खेळातील मी एक सोंगटी आहे. त्याच्या दृष्टीनं फायदेशीर असणाऱ्या 'घरात' ठेवायची, त्याचं काम झालं की काढून घ्यायची!"

 ललितेच्या "स्पष्ट” सत्यकथनानं मी दिग्मूढ झालो. तरीपण मला पटत नव्हतं. ती खरं म्हणजे काही लपवत नव्हती; आणि माझी - एका अनाहुताची सहानुभूती मिळवून तिला कोणताच स्वार्थ साधायचा नव्हता. माझ्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता, म्हणून मी तो अखेरीस विचारलाच.

 “ललिता, अशा परिस्थितीला तू शरण का गेलीस? घटस्फोटाचा विचार करता आला असता, कदाचित आत्महत्या करणंसुद्धा योग्य झालं असतं!" खरं म्हणजे, मी फारच क्रूरपणे माझ्या मैत्रिणीशी वागत आहे असं क्षणभर तरी मला वाटलं; पण ललिता शांत होती. तिला माझ्या प्रश्नाचा राग आला नाही. ती म्हणाली, "तू म्हणतोस ते खरं आहे. मी स्वतःशीच कधीकधी अंतर्मुख होऊन विचार करते, तेव्हा मला पण हाच प्रश्न पडतो. का नाही मी जीवनाचा अंत करून घेतला? पण खरं सांगू अवि ? जीवनाचा मोह विलक्षण असतो. आणि तुझ्यापाशी कबूल करायला हरकत नाही."

 "काय?"

 "मीच हळूहळू या स्वैर, भोगी जीवनाला चटावले. लहानपणी तूच एक संस्कृत श्लोक शिकवला होतास. आता नीटसा आठवत नाही. यथा मलिनैवस्त्रैः यत्र कुत्रोपि उपविश्यते' असा काहीसा आठवतोय. अंगावर छान कपडा असला की त्याला कुठं, कसली घाण लागून तो मलीन होऊ नये म्हणून आपण किती जपतो? पण एकदा का तो घाण झाला एखादा डाग पडला की मग आपण त्या कपड्याची फिकीर करत नाही.

निखळलेलं मोरपीस / १५७