पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “खूप प्रयत्न केला. पण जमलं नाही. त्यावेळी आम्ही लांब विशाखापट्टणमला असल्यानं कोणाला बोलावणं पण जमलं नाही. पिणं वाढत गेलं; तशी त्याची संगत बिघडत गेली. त्यातच सुलेमान आणि रुस्तुम भेटले."

 "हे कोण?"

 "बडी व्यापारी मंडळी आहेत; त्यांच्या आग्रहाने नोकरी सुटल्यावर दिलीपनं त्यांच्याच फर्ममध्ये नोकरी घेतली. त्यांचा इंपोर्ट एक्सपोर्टचा बिझिनेस आहे असं ते सांगायचे; त्या नोकरीनिमित्ताने आमचं वास्तव्य मद्रासला आलं. दिलीपच्या सिंगापूर- हाँगकाँग-बँकॉक अशा फेऱ्या सुरू झाल्या. काही वर्षं आम्ही तिकडेच काढली आणि तिथेच माझ्या सर्वनाशाला सुरुवात झाली."

 "म्हणजे?"

 "सुलेमान आणि रुस्तुम ही बडी स्मगलर मंडळी होती. दिलीपला पैशाची जबरदस्त चटक लागली. पैशाच्या जोरावर मिळणारे सर्व उपभोग घेण्यात नीती- अनीतीची कोणतीही चाड त्याला वाटेनाशी झाली. आणखी... आणखी काय सांगू?”

 “म्हणजे? तुझाही..."

 "हो, या बिझिनेस-एटिकेट्समध्ये स्त्रीचं सौंदर्य महत्त्वाचं, तिचं चारित्र्य नाही! ह्या पैशाच्या हव्यासापोटी एके दिवशी माझाही बळी दिलीपनं दिला. रुस्तुम आणि सुलेमान कंपनीची मी 'स्लीपिंग' पार्टनर झाले!"

 "ललिता !" मी माझ्या नकळत ओरडलो. "हे खरं बोलतेस..? की तुला व्हिस्कीची किक् आलीय?"

 "नाही रे. आता कशाचीही किक् येण्याच्या पलीकडे गेलेय मी."

 माझ्या अंगावर सरसरून काटा आला. संध्याकाळी वाईच्या घरात हात जोडलेली आणि रामरक्षा म्हणणारी माझी ललिता मला आठवली. ललितेची कणव येण्याऐवजी मला घृणा आली. मनात तिरस्कार दाटून आला. अंग-प्रत्यंग दाखविणाऱ्या- माझ्यासमोर गुलाबी मॅक्सीत बसलेल्या ललितेच्या एक जोरात मुस्कुटात द्यावीशी वाटली; कदाचित त्या आविर्भावात माझा हात उगारलाही गेला असावा. कारण एकदम ललिता म्हणाली,

 “मार, खरंच मार मला; तेवढा अधिकार फक्त तुझाच आहे."

 आणि तिच्या नजरेतील खरेपणामुळे मला एकाएकी तिची खूप दया आली; तिला जवळ घेऊन थोपटावं असंही वाटलं. अचानक काही तरी आठवून मी म्हटलं,

निखळलेलं मोरपीस / १५६