पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी बघतो तेव्हा वाटतं की या सर्वांपेक्षा मी एका वेगळ्या उंचीवर आहे, फक्त ते कधी मी सिद्ध करू शकलो नाही. करू शकणार पण नाही."

 "मग आता, तुला माझा तिरस्कार वाटत असेल ना?"

 "अजिबात नाही. तू मला आयुष्यभर सतत आठवत बसावं असं काही तरी दिलंस. हा ठेवा मी मनाशी बाळगत आलो. माझं, माझं खूबसूरत दुःख मी कौतुकानं गोंजारत आलो. आणि ह्यामुळेच माझ्या मुलीनं एका परजातीच्या तरुणाशी लग्न करू का? असं विचारलं तेव्हा मी थोडीसुद्धा खळखळ केली नाही. अतिशय सद्गुणी बुद्धिवान डॉक्टर मुलगा आहे तो. पण दोघांच्या ऐहिक सुखसंपत्तीपेक्षा त्या दोघांच्या मानसिकतेचा विचार मी अधिक केला. आप्तेष्टांनी पुष्कळ कोल्हेकुई केली, पण त्या दोघांच्या प्रेमाच्या घरट्याला यत्किंचितही धक्का लागणार नाही ह्याची मी सर्वतोपरी काळजी घेतली."

 एवढ्यात बेल वाजली. वॉचमन सगळे खाद्यपदार्थ घेऊन आला होता. ललितानं सगळं कारपेटवरच मांडलं. आम्ही दोघं खालीच बसलो. ड्रिंकचे घुटके घेत-घेत बसलो. मी ललिताला म्हटलं,"

 मी माझंच सगळं सांगत बसलोय. तुझं बोल ना! 'अपनी कहो, कुछ मेरी सुनो, ' असं झालं पाहिजे ना? बोल. आमचे कमांडरसाहेब काय करतात? तुझी मुलं काय काय शिकतात?"

 "तू जेव्हा मघाशी म्हणालास ना की आता कमांडरसाहेब आले आणि जर आपल्याला त्यांनी बघितलं तर रिव्हॉल्व्हर तर काढणार नाहीत ना? तेव्हाच मला तुला सांगायचं होतं."

 "काय?"

 "हेच! की दिलीपचं इतकं प्रेम माझ्यावर असतं तर मला खूप बरं वाटलं असतं."

  "म्हणजे? तुम्ही एकत्र आहात ना?" मी काळजीनं विचारलं.

 "हो, तसे एकत्रच आहोत; पण मनानं फार फार दूर आहोत. आमचं लग्न झालं तेव्हा दिलीप खूप चांगला होता. नेव्हीमध्ये एकामागोमाग एक अशी प्रमोशन्स मिळावीत म्हणून धडपड करणारा एक चांगला करिअरिस्ट होता."

 "मग बिघडलं कुठं ?"

 "एका प्रमोशनच्या वेळेस त्याचं सिलेक्शन झालं नाही. काही तरी वशिलेबाजी झाली असं त्याचं म्हणणं. मग रागाच्या तिरीमिरीत त्याने नोकरी सोडली. भरपूर पिणं सुरू झालं!"

 "मग? तू त्याला सावरलं नाहीस?"

निखळलेलं मोरपीस / १५५