पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाताचं आमचं शौर्य ते कसलं? म्हणून तर आपल्यातं बाजीराव पण एखादाच व्हायचा!"

 "मग लग्न केव्हा केलंस?"

 "आई फारच भरीस पडली आणि तुला आता विसरायलाच हवं ह्या कटू वस्तुस्थितीची जाणीव झाल्यावर, आईला आवडलेल्या मुलीशी लग्न करून टाकलं. तुझा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण तुझे नातेवाईक ताकास तूर लावून देत नसत. काही-काही तर फिदीफिदी हसायचेसुद्धा. मग निमूटपणे सर्वसामान्य माणसारखा संसाराला लागलो. तलतच्या रेकॉर्डस् - मेघदूत - शांकुतल माळ्यावर टाकून दिलं. परमेश्वरानं तुझ्या रुपानं एक सुंदर संपूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्य दाखविलं हेच आपलं परमभाग्य. आणि असं इंद्रधनुष्य सदा-सर्वकाळ आकाशात राहूच शकत नाही. ह्या वस्तुस्थितीची पण मला हळूहळू जाणीव झाली. सुदैवानं सुमतीसारखी सद्गुणी, सालस बायको मिळाली. आता माझी मुलगी डॉक्टर होतेय. धाकटा मुलगा इंजिनीअरींगला गेलाय्. तुझ्यासारखा ललितमहाल नसला तरी तीन खोल्यांच्या छोट्याश्या ब्लॉकमध्ये साधारण मध्यमवर्गीयाचा सुखी संसार व्यवस्थित चालला आहे. एक चूक मात्र मी सदोदित करायचो, आणि अजूनही करतो कधी कधी."

 "ती कोणती?"

 "सुमतीमध्ये मी सतत तुला शोधायचा प्रयत्न करायचो आणि स्वतःला खट्टू करून घ्यायचो."

 "तिला सगळं सांगितलं होतंस?"

 “मी नाही, पण लग्नाआधी बहुतेक आईनं सगळं सांगितलं असावं; पण तिनं कधीच विचारलं नाही. आता मला हसूं येतंय."

 "ते कशाचं?"

 "ते अशा गोष्टीचं की एका अप्राप्य गोष्टीसाठी मी स्वतःला उगाचच झुलवत ठेवलं. तुझं रूप, तुझी श्रीमंती ह्या साऱ्यांच्या तुलनेत मी अत्यंत नगण्य होतो, हे सगळ्यांना ठाऊक होतं, मला पण पटत होतं, पण मी पटवून घेत नव्हतो. पण एक सांगतो ललिता.”

 "काय?"

 "आपला चार-पाच वर्षांचा सहवास म्हणजे माझ्या आयुष्यातील एक संगमरवरी स्वप्न होतं. वास्तवात आल्यावरही विरहवेदना किती सुखकारक असतात ह्याचा मी आजवर सतत अनुभव घेत आलोय्. वाटतं, आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी प्रेमात पडावं. काय अनुपमेय अनुभव असतो तो? खरं म्हणजे तुझा मला खूप राग यायला हवा. माझं गाणं, माझं लेखन, काव्य-लेखन हे सारं, तुझ्यामुळे संपून गेलं. आज आजूबाजूला

निखळलेलं मोरपीस / १५४