पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलं नसतं!"

 "का?" मी आश्चर्यानं विचारलं.

 "तू जर पत्र टाकलंस तर त्या xxxx आव्याला गोळी घालून कायमचा ख़तम् करीन असं पप्पांनी मला शंभरदा बजावलं होतं; आणि तुला माहीत आहेत, आमचे पप्पा किती गरम डोक्याचे होते ते. मुकाट्याने कॉलेजला नाव घातलं. पण अभ्यासात प्रगती शून्य. एकंदरीत माझा रागरंग बघून पप्पांनी माझं लग्न लावून दिलं. त्यावेळी दिलीपचं पोस्टींग विशाखापट्टणमला होतं. आणि तू मला क्षमा कर अवि, मी हळूहळू तुला विसरतच गेले."क्षणभर थांबून ललिता म्हणाली,

 "आता तुझं सांग."

 "माझं सांगण्यासारखं काही नाहीच. तुला तडकाफडकी ग्वाल्हेरला नेलं आणि तुझ्या लग्नाची बातमी ऐकल्यावर मी पार हादरून गेलो. इंटर सायन्सची परीक्षा तोंडावर आलेली. मला परीक्षेला बसायची इच्छाच नव्हती. पण आईच्या डोळ्यातील पाणी बघून बसलो. अपेक्षेप्रमाणे फर्स्ट क्लास चुकलाच. सेकंड क्लास मिळाला आणि इथे हवा होत कुणाला फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन ? तू गेलीस आणि जीवनाची सारी चवच गेली."

 "सॉरी हं अवि, तुला आवड नसताना तुझं मन मारून तू सायन्स साईडला गेलास. तू इंजीनिअर-डॉक्टर व्हावास म्हणजे आई-पप्पांना तू अॅक्सेप्टेबल झाला असतास अशी माझीच भाबडी कल्पना; त्यावेळी खरं काही कळतच नव्हतं बघ."

 "मग नंतर काय केलंस?"

 "वाईत रहाणं शक्यच नव्हतं. मी रिझल्टची पण वाट न बघता आपले ते समोरच्या गंगापुरीवाले सबनीस होते ना, त्यांच्या ओळखीने एका फार्मास्युटिकल कंपनीत मुंबईला नोकरीला लागलो. फिरत्या होत्या. भटकायचो. तलतच्या गजला ऐकत मनातल्या मनात तुझी आठवण जागवत बसायचो. याच काळांत शरच्चंद्रांच्या देवदासने माझ्या मनात घर केलं होतं. स्वच्छंदी जीवन जगत जगायचो. हिंदी-इंग्रजी चित्रपट बघत त्यातून तुझी प्रतिमा डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न करायचो; पण आई बाबा माझा पिच्छा सोडेनात. शिक्षण तर केव्हाच सोडून दिलं होतं. तू तर माझ्यापासून दूर गेलीस मग आता कशाला शिकायचं आणि माझ्या नोकरीत अधिक शिकायची तशी गरजच नव्हती. आणि खरं सांगू ललिता, माझ्यातील जिद्द, महत्त्वाकांक्षा सारं काही ठार मरून गेलं होतं. एकदा वेडाच्या भरात मी ग्वाल्हेरला पण निघालो होतो. आता हसूं येतंय पण कोणता विचार होता मनात, माहीत आहे? चक्क तुला पळवून न्यायचा. आणि अळू-

निखळलेलं मोरपीस / १५३