पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तू कसा खूष होशील ह्या कल्पनेच्या तंद्रीत मला केव्हा तरी झोप लागली. शांत, समाधानी झोपेतून डोळे चोळत सकाळी उठले ते समोर आई आणि पप्पा हातात पत्र घेऊन समोर बसलेले. मला सगळ्या अनर्थाची कल्पना आली. पप्पांनी त्यांच्या मिलिटरी खाक्याप्रमाणे मला भरपूर बदडून काढलं."

 “अरे बापरेऽऽ!” माझ्या ललितेला कोणी मारतंय ही कल्पनासुद्धा मला सहन होण्यासारखी नव्हती. जसं काही आत्ता डोळ्यासमोरच ही घटना घडतेय असं वाटून मी ललितेला थोपटलं.

 "आणि मग काय? वाई मी कधीच बघितली नाही." ललितेच्या डोळ्यात अश्रू डबडबलेले होते. अश्रू कसले? सगळे मोती होते मोती; आणि त्या साऱ्या मोत्यांचा मी एकच जवाहिरा होतो!

 "पुढचं तुला नीट माहीत नसेल ना?"

 "नाही; तुझे आई-पप्पा आले; तुझं सगळं सामान- सुमान घेऊन गेले. तुझं लग्न ठरलंय. मामाच्या लग्नातच तुला कुणी नेव्हीमधल्या देखण्या तरुणानं मागणी घातलीय. तो लागलीच इंग्लंडला ट्रेनिंगसाठी जाणार म्हणून आमच्या कानावर आलं; मग आमच्या बाबांची बदली दूर मराठवाड्यात झाली, आणि आमचं बिऱ्हाड तेथून हाललं."

 “ती सगळी आमच्या पप्पांची कारवाई! एका फडतूस कारकुनाच्या आणि आमच्याच घरात भाडेकरू असलेल्या कंगाल माणसाच्या मुलांवर माझी मुलगी प्रेम करते म्हणजे काय? पप्पांनी सगळा सूड बिनबोभाट उगवला. त्यांच्या सगळीकडे दांडग्या ओळखी होत्या. आरडाओरडा केला तर आपलीच अब्रू जाईल म्हणून सगळं काही ह्या कानाचं त्या कानाला कळू न देता त्यांनी पार पाडलं.”

 “मग खरं काय होतं? तुझं लग्न झालं लगेच...?"नाही रे. हे केवळ तुझ्या कानावर जाण्यासाठी होतं. पण अर्धवट खरं होतं. पप्पांच्या मित्राच्या घरी मी सर्वांना आवडायची म्हणे. त्यांचा मुलगा दिलीप नेव्हीमध्ये होता. म्हणजे माझा नवरा."

 "मग लग्न केव्हा झालं? कॉलेज जॉईन केलंस?"

 "ते इंटरचं वर्ष फुकटच गेलं. घरी मी रडून रडून दिवस काढले. पण पप्पांना दया येणं शक्यच नव्हतं; आईला तर माझं वाईला राहणं पहिल्यापासूनच पसंत नव्हतं; आधीच तिचं आणि माईचं विळ्याभोपळ्याचं सख्य! तिनंच फूस दिल्यामुळं माझं हे सारं प्रेम- प्रकरण घडलं असं म्हणून तिनं माईवरच आग पाखडली. तुझा ठावठिकाणा माहीत नसल्याने तुलाही मी चोरून पत्र लिहू शकत नव्हते; आणि माहीत असतंही तरी तसं

निखळलेलं मोरपीस / १५२