पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटली नाही?"

 "हाच प्रश्न मी पण तुला विचारू शकतो ललिता! आणि खरं सांगू? तुझ्या आई- पप्पांनी अचानक तुला वाईतून ग्वाल्हेरला नेलं. तुझं लग्न ठरलं असं कळल्यावर मी पार वेडापिसा झालो. तू गेल्यावर माझा पुरा देवदास झाला. कॉलेजात जायचा मी बंद झालो. पुढं आमचं वाईतून बिऱ्हाडपण हललं."

 "हललं नाही; हलवलं गेलं!"

 "म्हणजे?"

 "त्या सगळ्या अनर्थाला मीच कारणीभूत आहे."

  "म्हणजे? असं झालं तरी काय?"

 "तुला आठवतं? आपण इंटरला असताना, मी फेब्रुवारीमध्ये, माझ्या मामाच्या लग्नासाठी ग्वाल्हेरला गेले होते ते?".

 "हो, आणि जाताना मला बजावलंस पण. मी आता आठ-पंधरा दिवस नाही तर चांगला भरपूर अभ्यास करून घे. तुला फर्स्ट क्लास मिळायलाच हवा. तरच इंजिनीअरिंगला किंवा मेडिकलला जाता येईल.."

 "मी ग्वाल्हेरला गेल्यावर मामाचं लग्न वगैरे व्यवस्थित झालं. सगळे घरातले पाहुणे परतले आणि मला तुझी फार-फार आठवण यायला लागली. त्यातच आई आजारी पडल्याने माझं परतणं आणखीनच लांबलं. मी परीक्षेचा अभ्यास बुडवायचा नाही म्हणून मेघदूत वाचायला नेलं होतं. तू शिकविलेलं मेघदूत सारखं आठवायचं."

 "खरं म्हणजे सायन्सला असूनसुसुद्धा मी तुला मेघदूत शिकवायचो. तू म्हणायचीस पण, की कॉलेजात सरांनी शिकविल्यापेक्षा तू शिकवलेलं जास्ती कानात घुमतं; अधिक चांगलं समजतं."

 “तेच सगळं नडलं. उज्जैनला जाऊन आल्यानंतर एके दिवशी कालिदासाच्या काव्यावरून मैत्रिणीत बोलताना, मी तुझ्याविषयी त्यांना खूप खूप कौतुकाने भरभरून सांगत होते; त्यावरून त्यांनी माझी चेष्टा पण केली. त्या गंमतीने म्हणाल्यादेखील की ‘मेघदूतात यक्षाने पाठविला तसा संदेश तू का नाही तुझ्या अविला पाठवत?' मग काय, माझ्या मनानं लागलीच साद दिली; रात्री टेबललॅपजवळ बसून तुला मी भरपूर मोठं असं पत्र लिहिलं. लिहिताना काय रोमांचित झाले होते म्हणून सांगू?"

 "मग, पुढे काय झालं?"

 "पुढेच सगळा घोटाळा झाला. मी पत्र लिहिलं; गादीवर पडून पुन्हा-पुन्हा वाचलं, तुझ्यासारखं काव्यमय भाषेत मला लिहिता आलं ह्याचा आनंद ... आणि पत्र वाचल्यावर

निखळलेलं मोरपीस / १५१