पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "काय रे, कुठं एवढी तंद्री लागलीय्! कॅसेट केव्हाच संपून गेलीय."

 मी एकदम भानावर आलो. हसत म्हणालो,

 “वाईला घाटावर कृष्णेच्या पात्रात पाय सोडून बसलो होतो."

 "अजून विसरला नाहीस काही?"

 “कसा विसरेन? माझ्या मनाचा कोपरा नि कोपरा त्यावेळी तू व्यापून टाकला होतास."

 माझी अपेक्षा होती की ललिता पटकन् माझ्या शेजारी येऊन मला बिलगेल; जुन्या दिवसांच्या आठवणी काढत ती माझ्यासारखीच भावविवश होऊन जाईल. पण तसं काही झालं नाही. ती आत गेली. येताना हातात काचेचे ग्लास होते. नंतर तिने काजू, वेफर्स असे एका प्लेटमध्ये आणून ठेवले; दोन्ही ग्लासमध्ये व्हिस्की ओतली. माझ्या हातात एक ग्लास दिला; चिअर्स केले. आम्ही एक-दोन घुटके घेतले. आम्ही आल्याबरोबर सुरू केलेला एअर कंडिशनर चालू झाला होता. त्यामुळे आता चांगलं गार-गार वाटायला लागलं होतं. माझ्या लक्षात आलं की आंघोळ झाल्यावर ललितानं उंची गुलाबी मॅक्सी घातली होती. बहुधा इंपोर्टेड असावी. या वयातसुद्धा ललिता चांगली सेक्सी दिसत होती, विशेषत: या मॅक्सीमध्ये. मला मात्र ती साडीमध्येच जास्ती आवडली असती! मी तिच्याचकडे निरखून बघतोय हे लक्षात आल्यावर सोफ्यावर ती माझ्या शेजारी येऊन बसली. व्हिस्कीचे घोट आणि शेजारी ललिता. मला स्वतःला तर मी जहाँगीर बादशहा असल्याचा भास होत होता. पण मी स्वत:ला सावरलं. वातावरणाचा कैफ मनावर चढण्यापूर्वी जरा बोलण्यात मोकळेपणा आणावा म्हणून मी ललिताला म्हटलं,

 "ललिता, आता तुझा नवरा आला तर आपल्याला गोळी घालील का ग? नाही तर पुन्हा एक नानावटी - अहुजा केस उभी राहायची!”

 "नाही रे बाबा! एक तर तो सिंगापूरला गेलाय् आणि एवढा माझा नवरा पझेसिव्ह असता तर माझी ही अवस्था झाली नसती?”

 “म्हणजे? तू तर चांगली ऐश्वर्यात दिसतेस, सुखात लोळतेस असंच वाटतंय्.” तिच्या सुटलेल्या देहाकडे पहात मी म्हटलं.

 क्षणभर ललिता थबकली. काही तरी बोलायचं तिच्या मनात असावं. मी पटकन् तिचा ग्लास पुन्हा भरला. एक-दोन घोट गेल्यावर ती आपणहून बोलायला लागेल अशी माझी अटकळ होती. आणि तसंच झालं. ती म्हणाली,

 "गेल्या पंचवीस-तीस वर्षात माझी काही खुशाली चौकशी करावीशी तुला

निखळलेलं मोरपीस / १५०