पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रिझल्टच्या वेळी कळलं. ललिता फर्स्टक्लासमध्ये पास झाली तर डिस्टिंक्शन मिळवून मी शाळेत पहिला आलो. नेहमीप्रमाणे कृष्णा नदीच्या काठाने फिरत आम्ही पसरणी घाटाच्या बाजूच्या शेतात पाचगणी-महाबळेश्वरच्या डोंगराकडे पहात बसलो होतो. मी माझ्या यशाने हुरळून गेलो होतो. नेहमी माझ्या सान्निध्यात हसत-खिदळत असणारी ललिता त्या दिवशी बरीच गंभीर होती. ती एकदम म्हणाली,

 "आता तू काय करणार?"

 “म्हणजे?”

 "म्हणजे अॅडमिशन कुठे घेणार? सायन्सला की आर्टसला ?"

 "अर्थात आर्टसला! तू तिथं मी! आणि इथं सायन्स कुणाला आवडतंय ? छान शेक्सपीअर वाचू. मेघदूत - शाकुंतल वाचू. तू बरोबर असल्यावर मेघदूत वाचायला काय मजा येईल!”

 “नको. तू सायन्सलाच जा. आर्टसला गेलास तर नुसताच मास्तर होशील फार तर प्रोफेसर. सायन्सला गेलास तर चांगला इंजिनीअर होशील."

 "मला सायन्स आवडत नाही."

 "पण आमच्या पप्पांना त्यांचा जावई इंजिनीअर - डॉक्टरच हवाय, त्याचं काय?"

 “ललिता!” मी पण आता गंभीर झालो. मी नुसता आमच्या प्रेमातच मस्त मश्गूल होतो. व्यावहारिक जगाची मी कधीच जवळीक केली नव्हती. तरीच आईने दोन-तीन दिवसांपूर्वीच मला विश्वासात घेऊन, मायेने चार गोष्टी सांगितल्या होत्या. माझी अन् ललिताची सलगी तिला विशेष माहीत होती. तिच्या उपदेशाचा इत्यर्थ एवढाच होता की ललिता ही श्रीमंताघरची पोर आहे. आपल्या व तिच्या परिस्थितीत फार मोठी तफावत आहे. तेव्हा मी काही तिच्यात गुंतून जाऊ नये. शाळेपर्यंत ठीक होतं. आता कॉलेजात जायचं होतं. तेव्हा संभाळून राहणं आवश्यक आहे. मला आईच्या बोलण्याचा अर्थ समजला तरी मी तो फारसा मनावर घेतला नाही किंवा मला घ्यावासाही वाटला नाही. माझं आणि ललिताचं भावविश्व इतकं वेगळं होतं की त्याला कोणाचं नख लागेल कल्पनासुद्धा माझ्या मनाला शिवू शकत नव्हती आणि आता मला ललिता सायन्सला जाऊन डॉक्टर - इंजिनीअर व्हायला सुचवत होती. नाही तर तिचे पप्पा.....

∗∗∗

निखळलेलं मोरपीस / १४९