पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मग, चिकन् तंदुरी-बिर्याणी मागवून घेते." ललिताने तामीळमधून फोनवरून वॉचमनला काहीतरी सांगितलं.

 "तू बस आता ही टी-पॉयवरची मासिकं बघत. नाहीतर थांब. तुझ्या लाडक्या तलतची कॅसेटच लावते. मी वॉश घेऊन येते."

 कॅसेट सुरू झाली. "शामेऽ गम् की कसम." सुरू झालं. अजून ललिताला माझी आठवण आहे तर! नाही तर माझी तलतची आवड तिच्या कशाला लक्षात राहिली असती? माझं मन मोहरून गेलं. डोळे मिटून गाणं ऐकता ऐकता भूतकाळात शिरलं.

∗∗∗


 एके काळी म्हणजे हायस्कूलची शेवटची दोन वर्षे आणि कॉलेजची पहिली दोन वर्षं ललिता आणि मी एकमेकांत पुरे गुंतून गेलो होतो. खरं म्हणजे, पंधराव्या-सोळाव्या वर्षी प्रेम ही काय चीज आहे हे कळणं दुरापास्तच. पण मला मनापासून वाटतं की, आम्हाला त्या कोवळ्या वयातसुद्धा प्रेमाचा अर्थ कळला होता. कारण नुसत्या शारीरिक आकर्षणात आम्ही गुंतून राहिलो नव्हतो. काव्य-शास्त्र - विनोदाच्या महासागरात आम्ही किनाऱ्या किनाऱ्याने का होईना पण सतत डुंबत होतो. वर्गात पहिला-दुसरा नंबर मी कधीच सोडला नाही. ललिता अभ्यासापेक्षा संगीत- बॅडमिंटन क्षेत्रात अधिक रमायची. तिच्या बंगल्याच्या आऊटहौसमध्ये आमचं बिऱ्हाड होतं. तिचे वडील मिलिटरीत मोठ्या. हुद्यावर होते. त्यांच्या वरचेवर बदल्या होत, म्हणून त्यांनी ललिताला वाईलाच त्यांच्या आई-वडिलांकडे ठेवलं होतं. ललिताचे आजोबा करड्या शिस्तीचे तर आजी अत्यंत प्रेमळ. आम्ही तिला माई म्हणायचो. माईचा माझ्यावर विशेष लोभ असायचा. कारण त्या काळात आकाशवाणीवरून प्रस्तुत होणारी गीतरामायणातील गाणी मी त्यांना तन्मयतेनं म्हणून दाखवायचो. आजोबा करड्या शिस्तीचे असले तरी एका पायाने अधू असल्याने त्यांची बरीचशी कामे मी आपणहून करायचो. ललितेसाठी त्या दोघांची 'मर्जी' मी सांभाळून ठेवणे आवश्यक आहे हे तिनंच मला सुचविलं होतं. माईना आम्हा दोघांचं खूप कौतुक होतं. संध्याकाळी वाड्यातील मुलं रामरक्षा म्हणायला जमत. त्यानंतर माईंना आणि आजोबांना मी धार्मिक पुस्तकं वाचून दाखवी. रामायणातील युद्धकांड वाचताना आजोबा इतके हरकून जात की मी दमलोय हे त्यांच्या कधी लक्षांतच यायचं नाही. पुढे वाच-पुढे वाच, असं सारखं त्यांचं चालायचं. शेवटी माईंनाच माझी दया यायची. त्या दोघांची नजर चुकवून ललितेच्या दंडाला चिमटा काढत मी हलकेच पुटपुटायचो, ’हे सारं तुझ्यासाठी बरं का!' ललिता गोड हसली की माझे सारे श्रम मी विसरून जाई. ती माझ्यात किती खोलवर गुंतली होती हे मला माझ्या मॅट्रिकच्या

निखळलेलं मोरपीस / १४८