पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतील! त्या बाईनं मुलाला आधी आपल्या कुशीत झोपवलं असावं. पण त्यानंतर ते घसरत खाली आलेलं होतं. कारण त्याच्या अंगाखाली म्हणून घातलेलं जुनेरं बाजूला झालेलं होतं. कसं जगवणार ती दोघं आपल्या मुलाला ? का हताशपणे औषधाला पैसे नाहीत, म्हणून आपल्या डोळ्यांदेखत ते मूल देवाघरी निघालेलं त्यांना पहावं लागणार होतं? आता या क्षणी तरी ते मूल जिवंत असेल ना? का आताच ते मूल....?

 'त्या' विचारासरशी माझ्या अंगावर सरसरून काटा आला! माझी व्हिस्की खाडकन् उतरली! हिरव्यागार मखमलीवरून चालता चालता टचकन काटा घुसून पाय रक्तबंबाळ व्हावा, तशी माझी स्थिती झाली. मन सुन्न होऊन गेलं. त्याच विमनस्क अवस्थेत मी घरी गेलो. लॅच-कीने हळूच दार उघडले. गार पाण्याचा सपकारा मारुन बाल्कनीत आरामखुर्चीत जाऊन पडलो. काही केल्या झोप येत नव्हती. डोळ्यासमोर भिकूशेठची भली मोठी तिजोरी दिसत होती. त्यातील नोटांची बंडले दिसत होती आणि त्याचवेळी त्या बंडलांमधून मुलाच्या औषधासाठी पैसे मागणारी ती गरीब नवरा-बायको आणि निष्पाप मूल दिसत होतं. एकाएकी मला स्वत:ची लाज वाटली! त्या पाचशे रुपयांची पण चीड आली. त्या भिकूशेठच्या काळ्या पैशात मी सहभागी व्हायला नको होतं. त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळायला नको होती. ज्या गोरगरिबांच्या घामावर, इमारतींचे इमल्यावर इमले उठवायचे, त्यांच्या दुखण्याखुपण्याकडे मात्र बघायचं नाही, मग करायचेत काय ते पैसे? ही भयानक क्रूरता होती. दुसऱ्यांच्या दुःखाने मी खूपवेळा दुःखी होतो. पण ते तेवढ्यापुरतंच क्षणिक असतं. पण आज मात्र त्या लहान बाळानं मला फार अस्वस्थ केलं. त्या क्षणी गौतमबुद्धाच्या कारुण्यबुद्धीने माझ्या मनाचा कब्जा घेतला होता. बस, मी मनाशी निश्चयच केला की, सकाळी उठल्याबरोबर त्या वाळूच्या ढिगाऱ्याजवळ जायचं. त्या मजूर नवरा-बायकोच्या हातावर भिकूशेठने दिलेले ते पाचशे रुपये ठेवायचे आणि म्हणायचं, 'हे पैसे घ्या. मुलाला औषधपाणी करा. ते मूल जगलं पाहिजे.' त्या निश्चयाच्या सात्विक समाधानातच केव्हा तरी मला झोप लागली.


∗∗∗


 सकाळी उठलो. रात्रीची अस्वस्थता पार निघून गेली होती. पँटच्या खिशातील शंभराच्या पाच नोटा काढल्या. काय बरं वाटत होतं त्या कोऱ्या करकरीत नोटा बघताना! काय सुंदर वास होता त्या नोटांना. किती सुखद ऊब जाणवत होती त्या नोटांच्या सान्निध्यात! रात्रीची ती नवरा-बायको, त्यांचं ते आजारी मूल, मनाची घालमेल, सारं, सारंऽ काही मी पार विसरून गेलो. त्यांचं नशीब! आपण तरी जगात कुणा-कुणाला पुरं पडणार? असे जगात कितीतरी लोक असतील. ज्याचं त्याचं नशीब! आपण एकटं काय

सिद्धार्थ आणि गौतम / १४