पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे तीनशे रुपये. म्हणजे तीनशे गुणिले...... माझं विमान उडू लागलं! स्वाभाविकच होतं. इथं माझ्या कथा-कवितांना फार फार तर पन्नास-शंभर मिळायचे. ते सुद्धा कधीकधीच!

 पार्टी रंगात आली होती. भिकूशेठचे नोकर एकसारखे खारे काजू आण, वेफर्स आण, सलाड आण, असं ‘सर्व्ह' करता करता थकून गेले. व्हिस्कीच्या बाटल्या, सोड्याच्या बाटल्या कचाकच फुटत होत्या. आता मलाहि व्हिस्की चढली होती. ठेवणीतले एकाहून एक सरस असे 'नॉन-व्हेज ' जोक्स सांगून मी सर्वांना मनमुराद हसविलं. सर्वजण माझ्यावर आता फिदा होते. भराभर पुढील मुलाखतींच्या तारखा ठरत होत्या. ऑर्डर्स मिळत होत्या. आयुष्यात एक नवीनच दालन माझ्यासाठी उघडत होतं. अलिबाबाची गुहाच म्हणानात!

 मध्यरात्री केव्हातरी पार्टी संपली. सगळेजण पांगले. भिकूशेठने माझ्या हातावर लेखाचा मोबदला म्हणून पाचशे रुपये ठेवले. मी आश्चर्याने बघतच राहिलो. तेव्हा तो म्हणाला, ‘रमाकांतने तीनशे रुपये ठरवले होते, पन आपन लई खुष हाई बगा. तुमच्या लेखामुळं आपलं इंपार्टन्स लई वाढलं बगा. म्हनून हे पाचशे. यापुढं कवाबी या. आमच्या उद्योगधंद्यांना तुमची गरजच आहे.'

 भिकूशेठने जाताना गाडीने पोहोचवतो, असं सांगितल्यावर मीच म्हटलं, 'घर जवळ आहे. चांगलं चांदणं आहे. चालतच जाईन. पाय पण जरा मोकळे होतील.'

 रमाकांत त्याच्या स्कूटरवरून गेला. मी सिगारेट शिलगावली. शिटीवर गाणे गुणगुणत घरी निघालो. मोकळ्या हवेतला मध्यरात्रीचा गारवा मोठा प्रसन्न वाटत होता. आज मी स्वत:वर फार खूष होतो. तसा पोटापुरता पैसा नोकरीत मिळत होता. पण आता रमाकांतने माझ्यासाठी अलिबाबाची गुहाच उघडली होती. नवी नवी सुखं घ्यायला मन आसुसलं होतं. बायकोसाठी वॉशिंग मशीन, मुलाला स्कूटर, मुलीसाठी व्हि.डी.ओ....... माझ्या मनातली यादी लांबतच राहिली.

 मी चालता चालता कोपऱ्यावर आलो. तिथं भिकूशेठच्याच एका नव्या बिल्डिंगचे काम चालू होते. वाळूच्या ढिगांवर काही माणसं झोपली होती. माझं लक्ष एकदम एका बाजूच्या ढिगाऱ्यावर गेलं. मी चमकून बघितलं. हो, शंकाच नाही. भिकूशेठने कुत्रे सोडतो म्हणून घाबरवलेलं ते मघाचंच जोडपं दिसत होतं. ती नवरा-बायको अस्ताव्यस्त पसरली होती. अंगावरल्या तुटपुंज्या वस्त्रांची त्यांना शुद्ध नव्हती. त्या टायगरला सोडला असता, तर आता अंगावर होती ती पण चिरगुटं दिसली नसती! काय झालं असेल त्या मुलाला? पैशाच्याअभावी आपण मुलाला औषधोपचार पण करू शकत नाही, म्हणून किती कष्टी झाली असतील ती दोघं! त्या आईच्या मनाला किती यातना झाल्या

निखळलेलं मोरपीस / १३