पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाण्याच्या तुषाराने तोंड खारट अन् अंग चिकचिकीत झालं होतं. पाऊस जोरात नसला तरी येण्याची शक्यता होती. मद्रासला असा केव्हाही पाऊस येतो. तसेच धावत आम्ही गाडीपाशी आलो. कपडे झटकले. ललिताने गाडी भरघाव सोडली. मद्रास टी. व्ही. टॉवरचे तांबडे दिवे दूर-दूर दिसायला लागले. अन्नादुराईच्या पुतळ्याजवळची दिव्यांची रोषणाई मागे पडली. मद्रासच्या कोणत्या भागातून ललिता गाडी नेत होती तेच कळत नव्हतं. गाडीच्या काचांवर पावसाच्या पाण्याने पडदा धरला. शहरी झगमगाट मागे पडला. व्हायपर्सच्या मधून काचेतून नागरी वस्ती, इमारती विरळ होत असल्याचं दिसत होतं... तेवढ्या पावसातून ललिता गाडी छान पळवीत होती. मी कौतुकाने तिच्याकडे पहात होतो. तिचं मात्र ड्रायव्हिंगवर लक्ष होतं, म्हणून मी काही बोलायचा प्रयत्न केला नाही. एका आलिशान बिल्डिंगच्या पोर्चमध्ये ललिताने गाडी पार्क केली. वॉचमन माझ्याकडे निरखून बघतोय असं उगाचच मला वाटलं. लिफ्टने आम्ही वर आलो. लॅचकीनं ललितानं तिच्या फ्लॅटचं दार उघडलं. लाइट ऑन केले. मला मोठ्या महालात शिरल्यासारखं वाटलं. अभावितपणे मी म्हटलं,

 "अरे वा! मस्त आहे तुझा हा ललितामहाल!"

 ललिता हसली. घाईघाईनं आतील रूममध्ये जाऊन माझ्या हातात एक मोठा टॉवेल, एक लुंगी आणि एक टी शर्ट आणून दिला आणि म्हणाली,

 "आधी ओले कपडे बदलून हँगरवर ठेव. आंघोळ कर. गरम-गार पाहिजे तसा वॉश घे."

 मी मुकाट्याने बाथरूममध्ये शिरलो. गरम पाणी अंगावर घेतल्यावर खरंच बरं वाटलं. केसातील, अंगावरची वाळू आणि खारट झालेलं अंग स्वच्छ धुवून निघालं. चांगला ताजातवाना होऊन मी बाहेरच्या दिवाणखान्यात आलो. तेवढ्यात ललिता बाहेरून आली.

 "मी आता आंघोळ करते. नंतर आपण ड्रिंकस् घेऊ. घेतोस ना ? का अजून वाईकर भटजीच आहेस?"

 "नाही, नेहमी घेत नाही. पण आज घ्यावीशी वाटतेय."

 "बरं, जेवायला काय?"

 "म्हणजे आता तू करणार?"

 "नाही रे बाबा, आताच मी वॉचमनला सांगितलंय. नॉन-व्हेज चालतं ना?"

 मी मान डोलावली. पण का कोणास ठाऊक मला अचानक सुमतीच्या हातच्या खुसखुशीत भाजणीच्या थालीपीठाची आठवण झाली!

निखळलेलं मोरपीस / १४७