पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात मी स्वतःशीच आश्चर्य करीत होतो, ते या अकल्पित भेटीचं. तिचा माझा संबंध सुटल्याला वीस वर्ष झाली. ती गुलबक्षी साडी बघितल्यावर मनातली मोरपिशी आठवण जागी व्हायला आणि ललिता भेटायला एकच गाठ पडली. इंटर सायन्सची परीक्षा जवळ आली असतानाच तिच्या आकस्मित विवाहाची बातमी तापलेल्या सळीसारखी माझ्या कानात शिरली. सारी दुनिया माझ्याभोवती गरागरा फिरू लागली. तो वज्राघात मी सहन करू शकलो नाही. पुरा हादरून गेलो होतो त्या दिवशी.

 एवढ्यात ललिता आली. हसत - हसत. आम्ही समुद्राच्या खूप जवळ जाऊन कोरड्या वाळूत बसलो. ललिता म्हणाली,

 "बोल आता. काय करतोस? कुठं असतोस? बायका-मुलं काय करतात? सगळं सांग."

 “सुरूवात कुठून करू? तू मला सोडून गेलीस तिथून करू?" मी हसत-हसत विचारलं. तसा ललितानं माझ्या पाठीत एक बुक्का मारला.

 "ए, आता इतक्या वर्षांनी भेटतोयस, आता शिष्टपणा नाही करायचा. नाही तर असं करू. आता घरीच बोलू. आधी जरा या बीचवर भटकूया."

 “छान कल्पना. तुझं हे मद्रास मला मुळीच आवडत नाही. फक्त हा बीच आणि गोल्डन बीच तेवढे आवडतात."

 उन्हं कललेली होती. समुद्रावरून खारा वारा येत होता. सूर्यबिंब क्षितिजाकडे हळूहळू सरकत होतं. त्याच्या लालसर छटा आजूबाजूच्या परिसरावर पसरलेल्या होत्या. त्याच्या पडछाया समुद्राच्या पृष्ठभागावर प्रतिबिंबित होत होत्या, असं सुंदर दृश्य समोर आणि शेजारी जन्मजन्मांतरीची सोबतीण होणार होती अशी सखी. मी रोमांचित झालो. पटकन् ललिताचा हात धरला. म्हटलं, "चल जरा पाण्यात शिरू."

 ती नको नको म्हणत असतानासुद्धा आम्ही पाण्यात शिरलो. लाटांमागून लाटा समुद्राच्या पोटातून येत होत्या. आमच्या पायाशी येऊन फुटत होत्या. मग एकदम जोरदार लाट आली. पायाखालची वाळू सरकली. ललिता पडू लागली तशी मी तिला घट्ट धरलं. एवढ्यात पावसाच्या सरी येऊ लागल्या. खरं म्हणजे मला असंच भिजत रहावंसं वाटत होतं. त्याक्षणी सर्व काही विसरायची माझी तयारी होती. समुद्राने आपल्या विशालकाय उदरात आम्हां दोघांची कायमची जलसमाधी बांधली असती तर मोठ्या आनंदानं ती स्वीकारायची माझी इच्छा होती.

 पण ललितानं खेचतच मला पाण्याबाहेर काढलं. पुन्हा आम्ही रेतीत आलो.

निखळलेलं मोरपीस / १४६