पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "तुझी खरेदी आटप. तोवर मी थांबतो."

 "अरे, तू इतक्या वर्षांनी भेटलास, आता कसली खरेदी! चल आपण बाहेर पडू."

 "पुन्हा क्षणभर ती रेंगाळली. काऊंटवरच्या मद्राशाला तिनं ती गुलबक्षी साडी पॅक करायला सांगितली. कॅश काऊंटरवर जाऊन तिनं बिल दिलं. शंभराच्या वीस-एकवीस तरी नोटा असतील. म्हणजे दोन एक हजाराची साडी असणार! मी तेवढ्या पैशात दोन- तीन साड्या ‘बसवायला' बघितल्या असत्या ! बिल देताना मी कौतुकानं ललिताकडे पहात होतो. तीस वर्षांपूर्वी ललिची जी इमेज मी मनात जपली होती त्यात तसा काही फरक नव्हता; निदान त्या इमेजला तडा जाण्यासारखा. निळसरपणाकडे झुकणारे डोळे, मागे सरकत गेलेलं भव्य कपाळ, गुबगुबीत गोबरे गाल, लिपस्टिक लावलीय् असे भासविणारे लालचुटूक ओठ. तिची उत्साही आणि हसरी मुद्रा. एकेकाळी काळेभोर लांबलचक आणि जाड असणारे केस मात्र आपला दिमाख गमावून बसले होते! केसांचा शोल्डर कट् झाला होता आणि देह मात्र चहूबाजूंनी सुटला होता. मात्र गर्द जांभळ्या सिल्क साडीमुळे आणि मूळच्या सतेज गौरवर्णामुळे ती आकर्षक दिसत होती.

  साडीचं पॅकीग माझ्या हातात देत ती म्हणाली,

 "चल, आपण बाहेर पडू."

 आम्ही बाहेर पडलो. तिने जवळच गाडी पार्क केली होती. गाडी सुरू केल्यावर मला म्हणाली,

 "बोल, किती दिवस मद्रासमध्ये आहेस?"

 मग मी माझी हकीकत सांगितली.

 "नशीब माझं! आजचा दिवस तरी आहेस. आता आपण जरा भटकून घरी जाऊ. सकाळी उठल्यावर दिवसभर भटकू. तुझ्या माऊंटरोडवरच्या हॉटेलमध्ये कळवायला पाहिजे असेल तर तिकडे गाडी घेऊ का?"

 "तशी काही गरज नाही. फक्त उद्या मला रूमचा चार्ज द्यायला संध्याकाळी जावं लागेल."

 मग आमची गाडी मरीना बीचच्या दिशेने धावायला लागली. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. हिवाळ्याचे दिवस असल्याने आणि कदाचित पाऊस यायची शक्यता असल्याने थोडेसे अंधारून आले होते. मरीना बीचचा विस्तीर्ण किनारा दिसू लागला. ललिताने रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली. आम्ही वाळूतून चालायला लागलो. तेवढ्यात समोरच एक टेलिफोन बूथ बघून ललिताला काहीतरी आठवल्यासारखं झालं. मला तिथेच थांबायला सांगून ललिता फोन करायला गेली. पाच मिनिटांत येते म्हणून.

निखळलेलं मोरपीस / १४५