पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१. निखळलेलं मोरपीस


 आमच्या कंपनीचा मद्रासला रिफ्रेशर कोर्स असतो. एकदा मद्रासला गेलं की शेवटचे सेशन् झाल्यावर प्रत्येकाची धाव असते ती टी. नगरमधील 'नल्ली' सिल्क शॉपकडे. सुंदर-सुंदर डिझाइन्सच्या आणि मनोहारी रंगाच्या सिल्क साड्यांचं प्रदर्शनच असतं म्हणानात. शनिवारी दुपारी प्रिन्सिपॉलचे फेअरवेल पार्टीचे लेक्चर झाल्यावर ऑटो करून ताबडतोब मी नल्ली शॉपकडे निघालो. आज इथलं काम आटोपलं की उद्या सकाळी बर्मा बझार आणि वेळ मिळाल्यास काशी-चेट्टीकडे जाऊन खरेदी आटोपता येईल असा मनाशी हिशोब केला. रविवारी रात्रीच्या मद्रास मेलने मला परतायचं होतं.

 नल्ली शॉपमध्ये तुफान गर्दी होती. कदाचित दिवाळी तोंडावर आली असल्यामुळे असेल. सगळ्या काउंटरवर खरेदीसाठी सगळ्यांची झुंबड उडालेली दिसत होती. अनेक साड्यांचे ढिगारेच्या ढिगारे पसरलेले दिसत होते. त्यातून निरनिराळ्या साड्या उलटसुलट करून पाहताना एक गुलबक्षी रंगाची साडी माझ्या हाताला लागली. मला आवडते तशी रुंद काठाची, भरघोस पदराची. पोटात नाजूक डिझाइन होतं. सुमती ललितासारखी गोरीपान असती तर कोणताच विचार न करता मी साडी पॅक करायला सांगितली असती. पण असे गडद रंग सुमतीला आवडत नसल्याने मी तो विचार सोडून दिला. क्षणभर मनाशी माझं मलाच हंसू आलं. ललिता माझ्या आयुष्यातून निघून गेली त्या गोष्टीला आता चांगली पंचवीस-तीस वर्षं सहज उलटून गेली असावीत. पण अजूनही मनाच्या सांदी-कोपऱ्यात दडून बसलेली तिची आठवण जात नाही कशी?

 मी ती साडी बघत होतो, तेवढ्यात काउंटरवरचा मद्रासी विक्रेता म्हणाला,

 "एक्स्क्यूज मी सर, दॅट पीस हॅज ऑलरेडी बीन सिलेक्टेड बाय मॅडम."

 "ओऽ, आय अॅम सॉरी!" म्हणत मी ती साडी त्याच्या हातात दिली. इथल्या मद्राशिणीला ह्या रंगाची साडी कशी काय शोभणार बुवा, ह्याचं आश्चर्य करीत साडी खरीदणाऱ्या बाईकडे मी कुतूहलाने बघितलं. पुन्हा बघितलं. पुन्हा पुन्हा बघितलं, आणि बघतच राहिलो. ती पण बघता-बघता जवळजवळ ओरडलीच,

 "अरे, अवि तू इथं? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज ! किती वर्षांनी भेटतोय आपण?"

 तिनं पटकन् माझा दंड पकडला. तिच्या डोळ्यात असीम आश्चर्य आणि आनंद होता. आजूबाजूची माणसं बघत होती, त्याचं भाग ठेवून मीच ललिताला म्हटलं,

निखळलेलं मोरपीस / १४४