पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नुसतीच दंतकथा नाही तर !

 मी मनोमन भक्तीभावाने 'त्या' अज्ञात शक्तीला, सर्वश्रेष्ठ परमेश्वराला प्रणाम केला.

∗∗∗


 आता माझे ऑपरेशन दोन दिवसांवर आले आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकले तेव्हा मी केवढा भयभीत झालो होतो ? नुसत्या मृत्यूच्या कल्पनेनेसुद्धा मनाचा थरकाप उडाला होता. आज मात्र अगदी 'स्थिरचित्त' झालो आहे. माझी सुमती, नातेवाईक, मित्रमंडळी, पैसाअडका, आता कशा कशाचा मला मोह नाही. खऱ्या अर्थाने मी आता 'निर्मोहि' झालो आहे.

 मनोहरन्ने आता मला मरण्याची नवी 'दृष्टी' दिली आहे. प्रज्ञावंत जगण्याची दिशा दाखवितात, पण मनोहरन्सारख्या जगाला सर्वस्वी अनोख्या असलेल्या एका महान विभूतीने कसं सुंदर 'मरावं' ह्याचा जणू आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे. ईश्वराने या जगात अनेक 'शापित' जीव जन्माला घातले. त्या शापित जीवांचे पूर्वजन्मांचे काही 'देणं' असेल तर माझ्या जीवनाची 'देणगी' देऊन मी त्यांचे ऋण परमेश्वराकडे चुकते करणार आहे.

 वॉर्डबॉय गोविंदाने आणून दिलेला मोठा हार तळमजल्यावरील गणेशाच्या मूर्तीसमोर मी ठेवेन. पेढ्याचा पुडा ठेवेन. मागणं एकच. मला 'तुझ्याकडे' घेऊन चल. शरीराने मी केव्हाच 'मोकळा' झालोय. माझा आत्मा आता त्या एक वर्षाच्या गोंडस अजयच्या शरीरात प्रवेश करू दे. त्याने हे सुंदर जग बघितले नाही. त्याला माझे जीवन लाभू दे. त्याला चांगला मोठा कर.

 एका 'ईश्वरी शापिताला" वाचविण्याचं, जीवदान दिल्याचं पुण्य मला लाभू दे ! परमेश्वरा, ऐकशील ना एवढी माझी अखेरची प्रार्थना!

निखळलेलं मोरपीस / १४३