पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खूपसून ब्लड काढत ते मनोजला कळायचं पण नाही. इतका मनोहरन् त्याला गोष्टीमध्ये गुंतवून टाकत असे! कधीकधी मनोज हॉस्पिटलला खूप कंटाळायचा. सारखं घरी चल म्हणून रडायचा. मग मनोहरन् त्याला १२व्या मजल्यावर फिरायला घेऊन जाई. ते मोठे क्रिकेटचं गरवारे स्टेडियम दाखवी. तुला मोठा क्रिकेटीयर व्हायचंय ना? मित्रांत तुला खूप खेळायचंय ना? मग घरी जाऊन कसं चालेल? इथले डॉक्टर्स तुला चांगलं बरं करणार आहेत. मग तुला खेळतांना, धावतांना आत्ता लागते तशी धाप मुळीच लागणार नाही. सगळ्यांसारखा तू खेळशील."

 "खरंच अंकल." मनोजला सारं पटायचं. आणि मग घरी जाण्याचा त्याचा हट्ट थांबायचा. खरंच भाई, जगात कुणाकुणाचे कसे कसे ऋणानुबंध असतात देव जाणे."

 त्यानंतरच्या दोन दिवसातील गोष्ट. दुपारच्या गप्पा आता पूर्णपणे थांबल्या होत्या. तरी कलकलाट ऐकू आला म्हणून मी वॉर्डातून बाहेर आलो. मनोजच्या वॉर्डमध्ये गर्दी जमली होती. माझ्या मनात चर्रर्र झालं! मी वॉर्डात गेलो तर सगळी आनंदात हसत होती. मनोजची आई त्याच्या बेशुद्धावस्थेतच नेहमीप्रमाणे त्याला गोष्ट सांगत होती; आणि कोकणातल्या फुकटात नारळ मिळविणाऱ्या त्या 'भटो भटो कोकणातल्या' वाल्या भटाची कथा ऐकताना मनोज अर्धवट हसला! नेमका त्याच वेळी मेरी सिस्टरचा राऊंड चालला होता. तिने मनोजच्या डोळ्यासमोर आपलं हातातील रिस्टवॉच धरलं. तिने सांगितले त्याप्रमाणे मनोजच्या आईने मनोजला मोठमोठ्याने हाका मारीत म्हटले. "मनोज, ए मनू हे घड्याळ बघ. मेरीमावशी तुला देतीय्." अन् काय आश्चर्य! मनोजने चक्क हात उचलून घड्याळ पकडण्याचा प्रयत्न केला; नि थोड्या वेळाने ते पकडले सुद्धा! मग सगळ्यांचा हाच खेळ चालू होता. कुणी म्हणायचं मनोज चेंडू पकड, तर कुणी म्हणायचं मनोज भांडं पकड आणि मनोजला ते कळायचं. डोळे मिटूनच तो प्रयत्न करायचा. मनोज अर्धवट का होईना शुद्धीवर आल्यामुळे वॉर्डात प्रथमच सर्वजण आनंदात होते.

 मला चटकन् मनोहरन्ची आठवण आली आणि एखादा साक्षात्कार व्हावा तसा माझ्या मेंदूत लख्ख प्रकाश पडला! ओऽ हो! मनोहरन्चा आत्मा मनोजमध्ये शिरला होता तर! त्याची प्रार्थना फलद्रूप झाली होती. इतर कोणी सांगितलं असतं तर माझ्या बुद्धीवादी मनाने त्याला वेड्यातच काढलं असतं. इथं तर ह्या घटनेचा म्हणजे मनोहरन्च्या मृत्यूचा, त्याच्या प्रार्थनेचा आणि मनोजच्या शुद्धीवर येण्यामागील कार्यकारणभाव जाणणाऱ्या 'गूढार्थाचा' मी एकमेव साक्षीदार होतो. माझा बुद्धीवाद पार गळून पडला होता. पूर्वजन्म, पुनर्जन्म, आत्मप्रवेश, आत्म्याचे आत्म्याशी मीलन, त्यांचा 'संवाद' ह्या साऱ्या गोष्टी माझ्या प्रत्ययाला आल्या होत्या. मृत्युशय्येवरील हुमायुनाचा प्राण वाचवण्यासाठी बाबर आपली जान अल्लाला कुर्वान् करतो आणि हुमायून वाचतो! ही

ईश्वरी शापित / १४२