पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "ऑल द बेस्ट मनोहरन्. सगळं व्यवस्थित होईल." मी त्याच्या पाठीवरुन हात फिरवीत म्हणालो.

 "भाई, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. पण माझं नाही, तर त्या मनोजचं!”

 माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहात तो पुढे म्हणाला,

 "भाई, तुम्हाला माहीतच आहे, केरळातील एक अनाथ मुलगा मी. या अफाट विश्वाच्या पसाऱ्यात खरं म्हणजे केव्हाच मी संपून जायचा. पण तुमच्यासारख्या एका भल्या कुटुंबात राहिलो. त्यांच्या आश्रयाने वाढलो, शिकलो. मुंबईत नशीब काढण्यासाठी आलो. चांगली नोकरी मिळाली. लग्न करून संसार करायचा विचार मनात यायला आणि हा आजार उद्भवायला गाठ पडली. माझ्यासाठी आता पाठीमागे रडणारं कोणी नाही. मी आत्ताच गणपतीला सांगितलं की मला 'ने' पण त्या मनोजला लवकर बरा कर." मनोहर शांत होता. मलाहि शांततेचा भंग करवेना.

 "चला भाई, वॉर्डात जाऊ. परमेश्वराला मी साकडंच घातलय्. हट्टच धरलाय्. मला तुझ्याकडे घेऊन चल. पण त्या चाळीस दिवस बेशुद्ध असलेल्या मनोजला शुद्धीवर आण. त्याला वाचवा. भाई, खरंच परमेश्वराने असं केलं तर या गणपतीपुढे माझ्यावतीने पेढे ठेवा. मोट्टा हार घाला त्याला."

 दुसरे दिवशी मनोहरन्चे ऑपरेशन झाले. आणि त्याची इच्छाशक्ती बलवत्तर ठरली. तो गेला. हसतमुखाने ऑपरेशन थिएटरकडे जाणारी मनोहरन्ची मूर्ती माझ्या डोळ्यांसमोरून हलेच ना." वासांसि जीर्णानी यथा विहाय... किंवा जातस्य ध्रुवो मृत्यू." हे सारं आम्ही वाचलेलं. पण अंगावरचा कपडा अगदी सहजतेने फेकून द्यावा तसं त्यानं आपलं शरीर परमेश्वरचरणी अर्पून टाकलं!

 साऱ्या वॉर्डभर खिन्नता पसरली. सारीजण शोकमग्न होती. त्याच्या भाषेत म्हणजे त्याचे सगळ्यांशीच ‘हृदया' पासूनचे संबंध होते. कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा अंकल असा प्रत्येकाचाच तो नातेवाईक होता. दोन दिवस भयाण शांततेत गेले. प्रत्येकजण समाचाराला यावं तसं माझ्याकडे येई इतकी त्याची माझी जवळीक सर्वांच्या परिचयाची झाली होती. मनोहरन्च्या आठवणी सांगत. मनोजची आई तर सर्वांपेक्षा अधिक रडत होती. आता तिला धीर देणारं कोणीच उरलं नव्हतं. स्फुंदत स्फुंदत ती म्हणाली,

 “भाई, काय सांगू तुम्हाला त्याच्या आठवणी ? मनोज त्याचा जीव की प्राण होता. काय दोघांची गट्टी जमायची देव जाणे? हॉस्पिटलचा स्टाफ जेव्हा रक्त घ्यायला येई तेव्हा मनोज रडून रडून सारं हॉस्पिटल डोक्यावर घेई. मग मनोहरन् त्याला मांडीवर घेई. थोपटून थोपटून गंमती सांगे. आणि स्टाफला खूण करी. मग ते लोक केव्हा सुई

निखळलेलं मोरपीस / १४१