पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मला मनाशी हसू आलं. एक मरणाच्या दारात! दुसरा वाटचाल करतोय!! आणि त्याला ती मित्राच्या लग्नाच्या कामात पुढाकार घ्यायला सांगत्येय. पण यातलं काहीच न दर्शविता मी म्हटलं,

 "चित्रा, काही वेडावाकडा विचार मनात आणू नकोस. तू लौकरच चांगली बरी होशील.”

 पण आता चित्राचं माझ्याकडे, माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. स्वत:शीच बोलल्याप्रमाणे तिचे स्वगत चालू होते. बराच वेळ बोलायला लागली तेव्हा मी सिस्टरला बोलावले. तिच्या मदतीने चित्राला झोपवले. सिस्टरने तिला कसलंसं इंजेक्शन दिले. एखाद्या लहान अजाण बालकासारखी ती शांत झोपली होती. अर्धवट हसल्यासारखी दिसत होती. मी तिची चादर नीट केली आणि हलकेसे थोपटून माझ्या वॉर्डात बेडवर येऊन पडलो.

 त्या रात्रीच चित्रा गेली. अगदी शांतपणे. सर्वांना वाईट वाटले. पण माझ्याखेरीज सर्वानाच ती गोष्ट समजल्यासारखी होती. त्या मानाने मलाच तिचा मृत्यू अनपेक्षित होता.

∗∗∗


 दोन तीन दिवस गेले. हॉस्पिटलचे रुटीन चालूच होते. वातावरणात मात्र उदासीनता होती. रोजच्या गप्पात थोडा खंड पडला. समोर कुणी आलं तरी प्रत्येकजण काहीतरी जुजबी बोलून निरोप घेई. दुपारी जेवणानंतर मनोहरन् माझ्याकडे आला तेव्हा मला जरा बरे वाटले.

 “भाई, चला. जरा तळमजल्यावरच्या गणपतीपर्यंत जाऊन येऊ." त्याचा चेहरा नेहमीइतका प्रसन्न नव्हता. काही न बोलता मी मान हलविली. सिस्टरला सांगून आम्ही लिफ्टने खाली आलो. गणेशाच्या भव्य मूर्तीसमोर बसलो. मनोहरन् पद्मासन घालून बसला. गणपतीच्या मूर्तीला भला मोठा हार त्याने घातला. उदबत्ती लावली. आणि थोडा वेळ शांतचित्त बसला. नंतर आम्ही तिथल्याच एका बाकावर बसलो. शांतपणे तो म्हणाला,

 "भाई, उद्या माझे ऑपरेशन आहे."

 "आँ? मग आधी बोलला नाहीस?"

 "डॉक्टरांनी तसं चार-पाच दिवसांपूर्वी सांगितलं, पण आजच कन्फर्म केलं.”

ईश्वरी शापित / १४०