पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेवढ्या अवधीत अजयने डोळे फिरविले. बघता बघता काळानिळा पडून बेशुद्ध झाला. सिस्टर्स धावल्या. असिस्टंट डॉक्टर आला. ऑक्सिजन लावला आणि अजयला ताबडतोब इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये नेण्यात आले. अजयची आई रडत होती. सारेजण तिची समजूत काढत होते. तासाभरानंतर अजय शुद्धीवर आल्याचे सिस्टरने सांगितले, तेव्हां ती शांत झाली.

 एकदा दुपारी केव्हातरी मनोहरन् म्हणाला म्हणून मी चित्राजवळ बसलो होतो. त्याची कसलीशी टेस्ट व्हायची होती. चित्राला मासिकातील एक-दोन कथा वाचून दाखविल्या. तिचे दादा सांगत तशा इकडच्या तिकडच्या गंमती-जंमती सांगितल्या. जराशी हंसली. थोडी थोडी बोलायला लागली. इतकी की मग थांबेच ना. तिलाच झेपणार नाही, बोलण्याच्या श्रमाने थकवा येईल म्हणून मी तिला थांबवत होतो. पण ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. सगळं बोलायची जणू तिला घाई झाली होती. आपला सगळा जीवन-वृत्तांत सांगत ती म्हणाली,

 "आमचे दादा आता फार दमतात हो काका. माझ्या आजाराने खूप थकलेत. रोज ठाण्याहून लोकलने ये-जा त्यांना झेपत नाही. माझ्या आजाराने सारं कुटुंबच आजारी झालंय. सगळेच कंटाळलेत. केव्हा एकदा सगळं संपेल असं मला झालंय." बोलता बोलता चित्राच्या डोळ्यांत पाणी जमा झालं! तिच्या मस्तकावरून हलकेच हात फिरवत मी म्हटलं,

 "चित्रा, तू शहाणी ना? जरा धीर धर. डॉ. शहा बघ तुझ्यासाठी किती धडपडत आहेत? त्यांच्यावर विश्वास ठेव. तू नक्की लवकर बरी होशील आणि तुझ्या अनिलबरोबर संसाराला लागशील."

 “काका!” 'एकदम काहीशा निश्चयाने चित्रा उठू लागली. तिला उशीचा आधार देत मी बसवले. नीट बसल्यावर चित्रा म्हणाली,

 "काका, माझं एक काम कराल?"

 “हो, अवश्य.”

 "काका, या आजारातून आता मी नक्कीच उठत नाही. अनिलला तुम्हीच समजवा. फार हळवा आहे तो. लौकरात लौकर त्याला अनीताशी लग्न करायला लावा."

  " ही अनीता कोण?"

 "माझ्याच ऑफिसातील माझी मैत्रीण आहे. तिलापण अनिल मनापासून आवडतो. पण माझ्याशी ठरलं म्हणून ती गप्प राहिली. तुम्हीच पुढाकार घ्या. घ्याल ना काका?"

निखळलेलं मोरपीस / १३९