पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निकामी होती. ती बदलायची होती तर दुसरीचा पॅसेज अगदी अरुंद होता, तो रुंद करायचा होता. ऑपरेशनला २५-३० हजार रुपये तरी खर्च येणार होता. वडील नागपूरला पोस्टात. कुठून कुठून पैसे उभे करण्यासाठी त्यांचा खटाटोप चालला होता. आणखी राजकुंवरच्या पाठीशी दोन-तीन भावंडं होती. १६ वर्षांच्या राजकुंवरला आई- वडिलांचे हाल बघवेनात, म्हणून एकदा ८व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या करायचा तिने प्रयत्न केला, पण वॉर्डबॉय गोविंदाच्या जागरुकतेने तिचा प्रयत्न फसला. दिवसभर तिचे आई-वडील तिला पोटाशी धरून ओक्साबोक्सी रडत होते.

 जयपूरच्या किसनलालची आई म्हणाली तेच खरं होतं. तिच्या आठ वर्षांच्या किसनलालचं ऑपरेशन व्हायचं होतं. किसनलालचे वडील जयपूरला होते. टूरीस्टबरोबर हिंडून गाईडचं काम करीत. पैसा मिळविण्यासाठी त्यांना तेथेच राहाणं भाग होतं. इथे हॉस्पिटलमध्ये आई एकटीच रहायची. छोटा किसन एकदम गोड मुलगा होता. काळेभोर लांब केस आणि बोलके मोठे काळेभोर डोळे. सगळ्यांना जयपूरला यायचं आमंत्रण द्यायचा. दद्दाजींबरोबर हिंडून सारा राजपूताना दाखवीन म्हणायचा. बोलता बोलता त्याची अर्धशिक्षित आई एकदा म्हणाली,

 "ही सगळी छोटी छोटी, प्यारी प्यारी मुलं बघितली की त्या परमेश्वराचा रागच येतो. त्यानंच या सर्वांना 'शाप' देऊन या जगात पाठवलं. माणसानं माणसांना छळलं, लुबाडलं तर बोलता येतं, रागावता येतं, चार शिव्या घालता येतात. पण ईश्वरानेच शाप देऊन पाठविलेली ही मुलं. काय बोलायचं त्या ईश्वराला ?

 खरंच किती सार्थ होतं तिचं बोलणं! प्रमोशनच्या मार्गात आडवा आला म्हणून आपण साहेबाला शिव्या घालतो. डिपॉझिट - पागडी कमी करत नाही म्हणून घरमालकाला बोल लावतो. पैसे घेऊन फसवलं म्हणून बिल्डरचे आई-वडील उद्धारतो, कोर्टात जाऊन दाद मागतो. माणूस माणसावर डाफरू शकतो. पण इथं तर सारं भांडणच परमेश्वराबरोबर! असा 'हृदयावरच घाव' घालायचा होता, तर या बालकांना जन्माला तरी कशाला घालावे? तो एक वर्षाचा अजय; त्याची देखणी आई. उमदा तरुण बाप. गडगंज श्रीमंती उतू जातेय्. पहिलाच मुलगा. किती कौतुकाचा आणि त्यांच्या नशीबी ही अवस्था ? काय हिशेब असतात परमेश्वराकडे? त्याचा तोच जाणे!

 विचार करता करता केव्हातरी मला डुलकी लागली. पण सगळ्यांच्या आरड्याओरड्याने जाग आली. मनोहरन् अजयजवळ बसला होता. कसल्यातरी आवाजाने अजय एकदम जागा झाला. आई जवळ दिसली नाही म्हणून मोठमोठ्याने रडायला लागला. मनोहरन्ने बाथरुमशी त्याला नेले. आतून आईने 'अजय मैं अभी आयी' करत आवाज दिला. पण ती काही पटकन् आवरून बाहेर येऊ शकली नाही.

ईश्वरी शापित / १३८