पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुटल्यावर मोठमोठ्याने भुंकत येईल, आपले लचके तोडेल, बाळाचा चावा घेईल...

 'नको मालक, दया करा. टायगरला सोडू नका,' असं म्हणत लगबगीने ती दरवाजाबाहेर पडली.

 भिकूशेठ बाहेर आला. आम्हाला बघताच म्हणाला, “रायटरसाहेब, तुम्ही उभं का? चला आतल्या लॉनवर जाऊ."

 त्याच्याबरोबर रमाकांत आणि मी आत हिरव्यागार लॉनवर गेलो. तिथं मोठ- मोठे गालिचे पसरले होते. बैठका मांडल्या होत्या. लोड-तक्के ठेवलेले होते. आजूबाजूच्या सर्व झाडांवरून, फुलझाडांमधून दिव्यांची रंगीबेरंगी रोषणाई केलेली होती. पलीकडे स्विमिंग टँक होता. आतवर सोडलेल्या निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशझोतामुळे स्विमिंग टँकचे पाणी चमकत होते. त्यातून एक इंद्रधनुष्य चमकल्यासारखे वाटत होते. क्षणभर मला म्हैसूरच्या वृंदावन गार्डनमध्ये बसल्याचा भास होत होता. भिकूशेठच्या परिवारातील एकेक माणसं जमली. विविध उद्योगधंद्यातील वीस-पंचवीस उद्योगपती आले होते. सारेच्या सारे लक्षाधीश, सॉरी, कोट्याधीशच. रमाकांतचा बहुतेकांशी परिचय दिसत होता. त्याने आणि भिकूशेठने माझी सगळ्यांबरोबर ओळख करून दिली.

 'मराठीतला मोठा रायटर हायेत हं ये साहेब.' सर्वजण नमस्कार करायचे. मला ओशाळवाणे वाटत होते. त्या श्रीमंती वातावरणात आणि धनाढ्य मंडळींमध्ये माझ्यासारख्या कारकुनी पेशाच्या माणसाला 'मिसफिट' वाटणं स्वाभाविकच होतं! मी रमाकांतला तसं म्हटलं पण. तेव्हा तो म्हणाला, 'अरे ही सुरुवात आहे. हळूहळू तू रूळून जाशील. श्रीमंतीची सुद्धा सवय करून घ्यावी लागते.'

 'ते ठीक आहे रे. पण तुझा हा भिकूशेठ ओळख करून देताना, मराठीचा मोठा रायटर म्हणून कसली ओळख करून देतो? कुणाला कळलं तर लोक काय म्हणतील?” तेव्हा रमाकांत म्हणाला, 'अरे बाबा, साहित्यातील काही 'कळणारी' ही माणसं असती तर ती अशी कोट्याधीश झालीच नसती! तुझे फडके, खांडेकर यांसारख्या चार मराठी लेखकांची नावे पण त्यांना माहीत नाहीत. भिकूशेठचा लेख तू लिहिलास म्हणजे त्यांच्या मते तूच आता लेखक ...... आता तुला किती 'ऑर्डर्स' मिळतील बघ.'

 आणि खरंच, भिकूशेठने भलावण केल्यावर मला तिथल्या तिथंच रमाकांतच्या भाषेत म्हणजे ‘ऑर्डर्स’ मिळाल्या. कुणाच्या व्यवसायाला पंचवीस वर्षे पुरी होत असल्याने रौप्यमहोत्सव होता, तर कुणा उद्योगपतीची पंचाहत्तरावी साजरी व्हायची होती. कुणी उद्योगपती परदेशी निघाला होता, तर कुणा एकाला सरकारने जे.पी./ दंडाधिकारी नेमलं होतं. या सर्वांवर मला लेख तयार करायचे होते. मनात विचार येत होते, एक लेख

सिद्धार्थ आणि गौतम / १२