पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 चित्राला झोप लागली अन् मग आम्ही तिथून उठलो. माझ्या वॉर्डात शिरता- शिरता मनोहरन् म्हणाला,

 "तो गोरटेला अनिल तिला भेटायला येतो, तो माहित आहे ना?"

 'हो', चित्राचे आई-वडील, बहिणी, सारीजणं आता माझ्या माहितीची झाली होती.

 “त्या अनिलबरोबर चित्राची एंगेजमेंट व्हायची होती.”

 "म्हणजे? आता...”

 "तो काय करणार? सर्वांनी त्याची समजूत काढली. अशा दुखणेकरी मुलीशी लग्न करु नको म्हणून. पण अजून त्याची समजूत पटत नाही. फार निष्ठावान आहे. चित्रावर त्याचं मनापासून प्रेम आहे. आजकाल असे तरुण दिसणं कठीण. सगळे तू नही तो और सही म्हणणारेच जास्त."

 " चित्राला कल्पना आहे?"

 "बहुधा नसावी. पण ती शहाणी, समंजस आहे. ती जरा बरी झाली की स्वत:च त्याला समजावेल."

 तेवढ्यात मनोहरन्ला शोधत अजयची आई आली. सकाळपासून बाथरुमला तिचा अंघोळीसाठी नंबरच लागत नव्हता. आता लागला तशी अजयच्या आणि तिच्या कपड्यांचं बोचकं घेऊन ती बाथरूमकडे निघाली होती. तिच्या एक वर्षाच्या अजयजवळ बसून त्याला थोपटत बसायचं काम आता मनोहरन्कडे होतं.

 मी पुन्हा पुस्तक हातात धरलं, पण पुस्तकात मनच रमेना. आजूबाजूला पसरलेली दु:खाची दुनिया मला अगदीच अनोखी होती. किती किती कोवळे जीव मरणाच्या दारात उभे होते. ओपन हार्ट सर्जरी (fallots tetralogy) झालेला आणि ऑपरेशननंतर गेले चाळीस दिवस बेशुद्ध, कोमामध्ये असलेला चार वर्षांचा मनोज. कधी तरी तो कोमातून बाहेर येऊन पूर्वीसारखी आपल्याला 'आई' म्हणून हाक मारेल अशा वेड्या आशेने चोवीस तास त्याच्या शेजारी बसणारी त्याची आई. जसा काही मनोज जागाच आहे असं समजून ती त्याच्याशी गप्पा मारायची, हलक्या आवाजात अंगाई म्हणायची, टेपरेकॉर्डरवरील त्याने म्हटलेली बोबड्या आवाजातील गाणी ऐकवायची, सिस्टरच्या बरोबरीने त्याच्या नाकातून घशात घातलेल्या नळीतून दूध पाजवायची, मोसंब्याचा रस द्यायची. राजकुंवरची तर कथाच वेगळी. तिच्या शरीरात असा काही विचित्र दोष होता की एखादी किरकोळ जखम होऊन रक्त यायला लागलं की थांबायचंच नाही. खवलीच धरली (clot formation) जायची नाही. तिच्या हृदयातील एक झडप पूर्णपणे

निखळलेलं मोरपीस / १३७