पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या दिवशी रविवार होता. ऑपरेशन्स नसल्याने नेहेमीची धावपळ नव्हती. मी माझं आवडतं पुस्तक "Towards the Silver crescents of Himalayas' वाचत बसलो होतो. तेवढ्यांत चित्राच्या वॉर्डमधून खूप आरडाओरडा ऐकू आला. चित्रा हुडहुडी भरून नुसती उडत होती. तिला कापरं भरलं होतं. अंगावर सगळीकडे रॅश उठला होता. सिस्टर्स तिला ऑक्सिजन लावत होत्या. मी चित्राला थोपटत बसलो. मनोहरन्ने तिच्या बेडभोवतीची गर्दी दूर केली. चित्राच्या आईला तो समजावत बसला. थोड्या वेळाने चित्रा पूर्णपणे शुद्धीवर आली. आम्ही आपापल्या वॉर्डात परतलो.

 मी बेडवर बसलो. मनोहरन् खुर्चीत. पलीकडे राजकुंवरचे वडील बसले होते. मनोहरन् म्हणाला,

 "आज सकाळीच चित्राला रक्ताची बाटली लावली होती. कधीकधी आपलं शरीर असं बाहेरून दिलेलं रक्त रिजेक्ट करते अन् रक्त नीट सूट झालं नाही की मग अशी रिअॅक्शन येते."

 राजकुंवरच्या वडिलांनी विचारलं,

 "चित्राला असा त्रास तर कसला आहे." तेव्हा मनोहरन् म्हणाला,

 "सहा-सात महिन्याखाली तिची ओपन हार्ट सर्जरी झाली. तिला कृत्रिम झडप बसविली आहे. ऑपरेशन चांगलं होऊन आपल्या पायांनी ती घरी गेली. ऑफिसात जायला लागली."

 "चित्रा नोकरी करते? केवढी लहान मुलीसारखी दिसते."

 "भाई, तुमचा विश्वास बसणार नाही. चित्रा चांगली २४ वर्षांची आहे. कॅनरा बँकेत नोकरी आहे. एकदा बँकेच्या टीममधून खेळता खेळता अचानक पडली. भोवळ आली. रक्ताची उलटी झाली. आणि हे दुखणं मागं लागलं. गेल्या ऑगस्टमध्ये तिची एक झडप बदलली. तीन महिने हॉस्पिटलमध्ये काढून आपल्या पायांनी आनंदात घरी गेली. मधले काही महिने बरे गेले; पण मग नंतर एकसारखा ताप यायला लागला, भूक मंदावली, वजन झपाट्याने खाली यायला लागलं. कोणत्याही औषधांची मात्रा चालेना म्हणून पुन्हा इथे अॅडमिट केलं. ती नवीन बसविलेली फॉरेनची व्हॉल्व तिच्या शरीराला सूट होत नाही.

 "डॉक्टर काय म्हणतात ?

 “काय म्हणणार? एकदा ओपन हार्ट सर्जरी केली की पुन्हा करणं कठीण. त्यातून चित्रा अगदीच खंगलीय. सारख्या रक्ताच्या बाटल्या लावाव्या लागतात. डॉक्टर वेगवेगळे प्रयत्न करून बघतात. बघा कशी एखाद्या शाळकरी मुलीसारखी दिसतीय बिचारी."

ईश्वरी शापित / १३६