पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "भाईसाब, तुम्हाला काय तकलीफ आहे? हार्टला होल आहे, का हृदयातली झडप बदलायची आहे?" एखाद्याला सायकल दुकानदारानं पंक्चर वगैरे विचारावं इतक्या सहजपणे तो विचारत होता. माझ्या आजाराविषयी मला स्वतःला एक शब्दसुद्धा बोलायला नको वाटायचा. पण इथं तर मरणयात्रेच्या मार्गावर तंबू ठोकूनच ही माणसं जमली होती! कुणी कुणापासून काय लपवायचं? मी मनोहरन्ला माझी सारी हकीगत सांगितली.

 "बायपास सर्जरी? अगदीच किरकोळ. उगाचच तुम्ही एवढे घाबरून बसलात! शहा, सक्सेना, एकापेक्षा एक बडे बडे निष्णात सर्जन्स आहेत इथं. बायपास सर्जरी एखाद्या टॉन्सिल्सच्या ऑपरेशनसारखी समजा तुम्ही." त्याच्या बोलण्याने नाही म्हटलं तरी माझी बरीच भीती कमी झाली होती.

 "आता उद्यापासून या वॉर्डमध्ये आपण फिरत जाऊ. एकमेकांची ओळख होईल आणि दुखण्यांची पण.”

 मग खरोखरच दुसऱ्या दिवसापासून दुपारची जेवणं झाली की मनोहरन् बरोबर माझा 'राऊंड' सुरू होई. तीन महिने बिछान्याला खिळलेली 'चित्रा' बघितली. हैद्राबादची आठ वर्षांची कोवळी गोड मुलगी 'ममता' बघितली. त्यांचे तर मुंबईत कोणीच नव्हतं. आईला ममतापाशी राहायला मिळायचं पण बाप बिचारा एका जैन धर्मशाळेत राहायचा. फुलके-भाजी खायचा. तसाच एक डबा बायकोला आणायचा. मुंबईची माहिती नाही. रस्ते क्रॉस करायला जमायचे नाही. बस नंबर कळायचे नाहीत आणि टॅक्सी परवडायची नाही. बरं ऑपरेशन केव्हा होणार? ते पण डॉक्टर लागलीच सांगायचे नाहीत. अगदी इमर्जन्सी नसेल तर सगळ्या पेशंटस्ना ऑपरेशन ठरण्यापूर्वी कमीत कमी एक महिना 'ऑब्जर्व्हेशनखाली' रहावेच लागे. त्यातून ठरलेल्या तारखेला ऑपरेशन होईलच याची शाश्वती नसे. कधी एखादी 'इमर्जन्सी' केस उपटायची. पाच वर्षांच्या मनोजला ऑपरेशन करायचं म्हणून उपाशी ठेवलं होतं. सारखा खायला मागायचा. आई-वडील, भाऊ-बहीण कुणाचं ऐकेना. रडून रडून सारा वॉर्ड डोक्यावर घेतला. मनोहरन्ने छान छान गोष्टी सांगत त्याला दोन तास रमविले; पण गोष्टी ऐकून त्याचे पोट थोडेच भरणार? आणि इतके करून पहिले ऑपरेशन, काही काँप्लिकेशन्स् निर्माण झाल्यामुळे लांबणार असे दिसल्यावर डॉक्टरांचा १२ नंतर निरोप आला की मनोजचे ऑपरेशन् कॅन्सल ! दूरगावाहून आलेले नातेवाईकपण मग परत गेले. नागपूरच्या १४-१५ वर्षांच्या राजकुंवरची कथा तर अगदीच वेगळी. चित्राची त्याहून दर्दभरी. अमोलबद्दल तर काय सांगावं नि किती असाच प्रश्न. हळूहळू मी सगळ्यांमध्ये रुळावलो. मनोहरन्च्या बरोबरीने मी सगळ्या वॉर्डमधील पेशंटस्कडे वडिलकीच्या नात्यानं बघू लागलो. स्वत:च्या दुःखातच गुरफटून बसण्याची माझी प्रवृत्ती आपोआप कमी झाली.

निखळलेलं मोरपीस / १३५