पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिडचिडा झालो होतो. पहिले दोन-चार दिवस मी माझ्या 'कोशातून' बाहेरच पडत नव्हतो. मग जरा हळूहळू इतर वॉर्डस्कडे लक्ष जायला लागले. माझ्या वॉर्डमध्ये माझ्यासारखे दोन-तीन वयस्क सोडले, तर इतर सारे पेशंटस् एक तर तरुण होते, नाही तर लहान लहान मुलं होती. डॉक्टरांचे राऊंडस् होत. त्यांच्याबरोबर असिस्टंट डॉक्टर्स, सिस्टर्स ह्यांचा मोठा फौजफाटा असे. एकदा मेट्रनचा राऊंड होई तेव्हा सगळ्या स्वच्छतेकडे तिचे करडे लक्ष असे. कुठे काही कमीजास्त दिसले की ती खूप मोठमोठ्याने आरडाओरडा करी. रक्त तपासणीसाठी हॉस्पिटल स्टाफ येई. पोरं रक्त घेताना किंचाळून रडत असत. त्यांच्या आया डोळ्यातून पाणी काढत. व्हील चेअरवरून कोणाला एक्स- रे, ई.सी.जी. साठी बाहेर काढलं जाई, तर कधी कॅथेड्राईनसाठी. आमच्या वॉर्डच्या एका टोकाशी ऑपरेशन थिएटर होते. स्ट्रेचरवरून पेशंटला तेथे नेले जाई; तोपर्यंत स्ट्रेचरवर पडल्यापडल्या त्याच्या मनाची काय उलाढाल होत असेल ? ऑपरेशन झाल्यावर पेशंटला स्ट्रेचरवरूनच जवळच्याच इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये नेले जाई. नाकाला नळ्या, ऑक्सिजनची सिलिंडर्स, हाताला सलाईनची बाटली वगैरे ती 'शोभायात्रा' बघितली की मनाचा थरकाप उडे. मी मनोमन एवढा भीतीने गांगरून गेलेला असायचा, पण वॉर्डमध्ये तर सारी मंडळी कशी मजेत दिसायची. हास्य-विनोद करायची. गप्पा छाटायची. जशी काय पिकनिकसाठीच एखाद्या लॉजवर येऊन उतरावीत तशी. मला त्यांचा हेवा वाटायचा. त्यांच्यात कोणीतरी मनोहरन् म्हणून केरळी तरुण होता. अस्खलीत मराठीत, हिंदीत बोलायचा, त्याची सगळ्यांशी दोस्ती दिसत होती. हृषिकेश मुखर्जीच्या 'आनंद'च्या नायकासारखाच आनंदी आणि उत्साही दिसायचा. सगळीकडे आनंदाची उधळण, हास्याची पखरण करत साऱ्या वॉर्डमध्ये त्याचा संचार असायचा!

 एकदा तो माझ्याकडे सुरी मागायला आला. समोरच्या पेशंटला, चित्राला सफरचंद कापून द्यायची होती. मी सुरी दिली.

 "काय होतय् चित्राला ? तुझी कोण नातेवाईक तर नाही?"

 "भाईसाब, इथं सगळ्यांचा आजार एकच तो म्हणजे 'हा'." छातीवर हात ठेवीत तो म्हणाला.

 "आणि नातं म्हणाल तर सगळ्यांचे 'हृदयापासूनचे' संबंध ! दर्द का रिश्ता !"

 मला त्याच्या बोलण्याची गंमत वाटली. खरंच सगळ्या हार्ट-पेशंटस्चा वॉर्ड. तेव्हा सगळ्यांचीच दुखणी हृदयाची. ती सारीजणं याच एका नात्यानं एकमेकात गुंतून गेली होती. थोडी ओळख झाल्यावर मनोहरनने मला विचारले,

ईश्वरी शापित / १३४