पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशाच एखाद्या विमानातून मी माझ्या आवडत्या इंग्लंडकडे झेपावणार होतो. पण कसचं काय? उंच उंच विहरणाऱ्या माझ्या नशीबाची दोरी दैवाने कटकन् कापली आणि.... मी या हॉस्पिटलच्या बेडवर येऊन कोसळलो!

 "साब, आपका टेंपरेचर लेना है ।" सिस्टरच्या शब्दांनी मी भानावर आलो. सिस्टरने थर्मामीटर लावला. नंतर ब्लड प्रेशर घेतलं. एका चार्टवर नोंद करून तो तेथेच कॉटला अडकवला. बाजूला तांबडा बिल्ला लावला होता. त्यावर लिहिने होते 'No salt.' सारं जीवनच खारट झालं होतं तिथं आता या आळणी जेवणाचं काय? थोड्या वेळाने वॉर्ड-बॉय आला.

 "साब, अपना कपडा बदली करो."

 मी माझा नेहमीचा पँट-बुशकोट काढून ठेवला. हॉस्पिटलचा पांढरा डगला चढविला. मनात म्हटलं, "परमेश्वरा, हा डगला किती दिवस मी अडकवून बसणार आहे? माझी सुटका सुखरुपपणे होईल ना या डगल्यातून? माझ्याच हातांनी मी हा कुडता-पायजमा उतरुन घरी जाईन ना? का? का...?" त्या भयानक शंकेसरशी माझ्या अंगावर सरसरून काटा आला.

 हॉस्पिटलमधील ती पहिली रात्र मी अत्यंत अस्वस्थतेत घालवली. आई-वडील, भाऊ-बहिणी यांच्यासाठीची सारी कर्तव्ये, बिनतक्रार पार पाडली. सगळ्या विवंचना बिनबोभाट झेलल्या. परमेश्वराने पोटी संतान दिलं नाही. ते दुःखही स्वीकारलं. अनितीनं वागून ऑफीसात अमाप पैसा चारचौघांसारखा करता आला असता, पण तसा विचारसुद्धा कधी मनाला शिवला नाही. नेकीनं केलेल्या कामाचं ऑफिसात चीज झालं होतं. ऑफिसतर्फे इंग्लंडला एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मला प्राप्त झाली होती. मी हरकून गेलो होतो. इंग्रजी माणूस आणि त्यांच्या लोकशाही परंपरा, त्यांचे वाङमय हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. साता समुद्रापलीकडून येऊन मूठभर लोकांनी आमच्यावर वर्षानुवर्षे अधिसत्ता गाजवावी, ह्यात त्यांच्या शहाणपणाचा भाग अधिक की आमच्या मूर्खपणाचा, याचे मला नेहमी कुतूहल वाटे. त्याच औत्सुक्यापोटी मी जेवढे म्हणून वाचता येईल तेवढे वाचले होते. आणि अशा या इंग्लंडमध्ये मला जायला मिळत होतं; जवळून सारं काही पाहण्याची, अभ्यासण्याची सुवर्णसंधी आली होती. मी मनाशी प्रथमच स्वत:साठी काही आशा धरली आणि अशा नेमक्या वेळी दैवाची माशी कशी शिंकली, का शिंकली? ते एक तो देवच जाणे! मी मात्र या हॉस्पिटलच्या तुरुंगवासात येऊन अडकलो खरा.

 सुमती, नातेवाईक, मित्रमंडळी भेटायच्या वेळेत येत. तेव्हा वरकरणी मी सर्वांशी हसून बोलायचा. उसनं अवसान आणून उत्साह दाखवायचा पण मनातून मी फार

निखळलेलं मोरपीस / १३३