पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०. ईश्वरी शापित


 एक सफाईदार वळण घेऊन टॅक्सी हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये उभी राहिली. प्रवेशद्वारापाशी असलेल्या श्री गजाननाच्या भव्य मूर्तीपाशी सुमती हात जोडून भक्तीभावे उभी राहिली. मी कधी पूजा-अर्चा करीत नसे. ते सगळं सुमतीकडे लागलं होतं. सतत कार्यमग्न असणाऱ्यांना देवपूजेसाठी कुठं वेळ मिळतो असं मी तिला चिडवायचा. बुद्धिवादी म्हणवून घेण्यात मला प्रौढी वाटायची. पण आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या स्वाधीनच्या नसतात. बुद्धिवादाच्या कसोटीवर त्या घासता येत नाहीत ह्याची मला या आजारात प्रकर्षाने जाणीव झाली. मी पण मनोभावे गणेशमूर्तीसमोर उभं राहून प्रार्थना केली.

 माझा बेड हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावर होता. रुम अगदी कडेची होती. मोठी प्रशस्त आणि हवेशीर होती. माझ्या रुममध्ये आणखी एक बेड दिसत होता. ‘हॉस्पिटलचे सारे सोपस्कार होईपर्यंत संध्याकाळचे सात वाजायला आले. व्हिजिटिंग अवर्स संपल्याची जोरदार बेल झाली, तशी पेशंटना भेटायला आलेल्या मंडळींची लगबग उडाली. सुमतीला निघणे भाग पडले. मला एकट्याला सोडून जाणे तिच्या जीवावर आलं होतं, पण इलाजच नव्हता. ऑपरेशन होईपर्यंत तरी मला स्वतंत्र रूम मिळणार नव्हती. सुमतीला लिफ्टपर्यंत पोहोचवून मी माझ्या बेडशी आलो. सिस्टरने दिलेल्या गोळ्या घेतल्या. वॉर्डबॉयने भरून ठेवलेल्या स्वच्छ काचपात्रातून पाणी घेतलं. थोड्या वेळाने कंटाळा आला म्हणून उठलो. पश्चिमेच्या बाजूला छोटीशी गच्चीवजा बाल्कनी होती. तिथं खुर्ची ओढून बसलो.

 संध्याकाळ होऊन सूर्यास्त झाला होता तरी अजून चांगला संधिप्रकाश होता. समुद्रावरच्या थेट येणाऱ्या गार वाऱ्यामुळे जूनमधील उकाडा तिथं जाणवत नव्हता. दूरवर क्षितिजरेषा अगदी स्पष्ट दिसत होती. आकाशात निसर्गाने सप्तरंग उधळून दिले होते. त्या विविधरंगी ढगांच्या पडछाया समुद्रपृष्ठांवर पडल्या होत्या. समुद्र शांत दिसत होता. इतका की त्यामुळे सारी जहाजे, गलबते, होड्या एखाद्या निर्जन रस्त्यावर उभ्या कराव्यात तशा दिसत होत्या. मध्येच माझे लक्ष आकाशातून डौलात उडत जाणाऱ्या विमानाकडे गेले. त्याचे उघड-झाप करणारे लाल-हिरवे दिवे जणू मला वेडावत होते.

ईश्वरी शापित / १३२