पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मांजर, सॉरी, कुत्रं आडवं आलं! त्या पटांगणात अनेक कुत्री जमिनीत उकरुन त्यात आपल्या देहाचं वेटोळं करुन झोपतात हे मला काय माहीत? पळताना अंधारात अशाच एका निद्रिस्त श्वानावर माझा पाय पडला मात्र, काय त्वेषाने ते श्वान भुंकलं म्हणता? मी गर्भगळीत झालोच पण शेजारी एका स्थितप्रज्ञ अवस्थेत उभे असलेलं गर्दभहि घाबरुन त्याचा काही अपराध नसताना पळत सुटलं. काही क्षणातच त्या गाढवानं मला मागं टाकलं आणि ज्याची आगळीक मी काढली होती ते कुत्रं मला पाठीमागून भिडलं. चौदा इंजेक्शन्स् माझ्या डोळ्यांसमोर चमकली! आणि तेवढ्यात समोरुन आलेल्या दूधवाल्याने दांडका उगारल्याने त्या कुत्र्याने माघार घेतली आणि माझी सहीसलामत सुटका झाली. पण त्या सुटकेच्या आनंदाला एका य:कश्चित गाढवाने आपल्याला पळण्यात सहज मागे टाकावं या दु:खाची किनार होती! मग वसाहतीमधील एकानं मला सांगितलं. "तुम्ही या भागात नवे आहात म्हणून तुम्हाला माहीत नाही. राजवाड्यातील मोकाट सुटलेल्या या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अनेकांनी नगरपालिकेत पत्रे लिहली, खेटे घातले पण व्यर्थ. म्हणून तर वसाहतीमधील कोणीच पहाटे या पटांगणात जात नाहीत!"

 काही दिवसानी एक ज्येष्ठ मित्र म्हणाला. "खरं सांगू? या वयात आपण व्यायामापेक्षा डायटिंग करावं हे उत्तम. तू दिवसाचं जेवण सोड. फक्त रात्री एकदाच जेव. ते सुद्धा मी सांगेन तेवढंच. दिवसा अगदी असह्यच झालं तर मोड आलेले मूग, मटकी खायचे आणि पाणी प्यायचे." हा उपाय मला ठीक वाटला. मूग-मटकीचा वाससुद्धा मला सहन होत नव्हता. पण प्राणप्रिय नातवाच्या मनात आजोबांची टवाळी यावी हे पण सहन होण्यासारखं नव्हतं. म्हणून नेटाने मी डायटिंग चालू ठेवलं. मला तरी, पोट आता हळूहळू कमी होतंय असं वाटत होतं. पण सुज्ञपणे कुणाला विचारलं नाही. उगाच टवाळकीला आमंत्रण! पंधरा एक दिवसातच मी कंटाळलो. मूग गिळून किती दिवस गप्प बसायचं? मग एक मित्र म्हणाला, "असलं डाएटिंग वगैरे चुकून करु नकोस हं." मला 'सुटका' दिसू लागली. मी विचारलं, "का रे बाबा? हे तर प्रकृतीला फार चांगलं असं म्हणतात." तो म्हणाला, "अरे वेडा आहेस का? या वयात भूक मारली ना तर पुन्हा भूक लागायचीच बंद होते. डॉक्टरांची औषधं घेऊन सुद्धा भूक पहिल्यासारखी लागत नाही. मग आपला 'इनटेक' कमी झाला की आपली एनर्जी कमी होते. कुठं तरी पडशील बघ रस्त्यात.” आता एवढं आपुलकीने आजकाल कोण सांगतोय ? मी तत्क्षणी मूगमटकीला सोडचिट्टी दिली.

 सध्या माझी स्थिती कुरुक्षेत्रावर भांबावलेल्या अर्जुनासारखी आहे. आपलं नेमकं ‘कर्तव्य’ कोणतं? कोणतं 'कर्म' केलं म्हणजे या पापी पोटापासून आपली सुटका होईल या संभ्रमात मी पडलेला आहे. कोण म्हणतं गोड सोड. कोण म्हणतं तेलकट सोड. कोण

पापी पोटाचा प्रश्न / १३०