पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"होकार' आला. आतून "आदेश" मिळाल्यानं मला बरं वाटलं. मी कामाला लागलो.

 कामाला लागलो म्हणजे काय तर अंतर्मुख होऊन विचार करु लागलो की सारं घडलं कसं? "नकळत सारे घडले." अशी उगाच स्वतःची समजूत घालण्यात काही मतलब नाही. कुठल्याही प्रॉब्लेमच्या अगदी 'पोटात' उतरून पहाणं मला आवडतं. विचार केल्यावर पहिल्यांदा माझ्या डोळ्यांसमोर आला तो आमचा ऑफिसातला सुब्रम्हण्यम् उर्फ सुब्बु. त्या बेट्याला चमचमीत आणि गोड पदार्थ खायची भारी आवड; त्यापेक्षा दुसऱ्याला खिलवण्याची. माझ्या भिडस्त स्वभावाचा फायदा- सॉरी-गैरफायदा घेऊन त्यानं मला सगळ्या हॉटेलातून फिरवलं. मद्राशी अप्पम काय, डोसे काय, फरसाण काय नि बडी काय? पुन्हा वर तऱ्हेतऱ्हेची आईस्क्रिमस्. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. हळूहळू पोट दिसू लागलं! पँट्स् बसेनात. पट्ट्याला अॅडिशनल भोकं पडायला लागली तेव्हा कुठं पोटाचा 'होल्डाल' बांधता यायला लागला. पँटची बटनं चेन लागली आहेत ना याची खात्री करुन घेण्यासाठी समोरच्या मोठ्या आरशात बघायची 'गरज' पडायला लागली; कारण मान खाली करुन बघावं तर पोटच पोट पसरलेलं दिसायचं! त्या पलीकडचं काही दिसायचंच नाही! आणि आमचा सुब्बु वर म्हणायचा, 'अरे यार, आपल्या मिडल् एजला पोटं सुटणारच. Middle Age is that when middle portion comes out... साईन ऑफ प्रॉस्पिरीटी यार! ह्या सुब्बुने मला ऑफिसात नेहमी गाफील ठेवलंय. प्रमोशनचे इंटरव्ह्यू केव्हा आहेत, डेप्युटेशनवर पाठवायचं आहे, इन्स्पेक्शन केव्हा यायची आहे असल्या सर्व बाबतीत जसं मला तो गाफील ठेवायचा तसं त्यानं या पोटाच्या बाबतीत पण केलं.

 ते काही असो. पण आता ‘पूर्ववत्' होण्यासाठी काही उपाय तर केले पाहिजेत! सर्वानुमते उत्तम उपाय म्हणजे मॉर्निंग वॉक, म्हणजे ब्रिस्क वॉक. गावात बरेच वॉकर्स क्लब होते. त्यातील मंडळी तीन चार मैलांची रपेट करत. पहिले तीन-चार दिवसी स्वेटर, मंकीकॅप वगैरे आयुधे घेऊन उत्साहाने गेलो. पाचव्याच दिवशी मला ताप भरला. थंडी वाजू लागली. मग बरेच दिवसांचे मध्यंतर झालं. नंतर एकजण म्हणाला, "अहो, एवढं लांब कशाला जाताय फिरायला? तुम्ही राजवाडा वसाहतीत राहता ना? तिथल्या पटांगणात दोन तीन फेऱ्या पळून काढा. दोन महिन्यात पोट कमी होतंय का नाही ते बघा." मला पटले. उगा गावाबाहेर तीन-चार मैल चालण्यापेक्षा हे बरं. मी लागलीच उत्साहाने कॅनव्हास शूज आणले. दुसरे दिवशी पहाटेसच गेलो. दिवस उगवल्यावर लोक दुधाला बाहेर पडतात. तेव्हा त्यांच्यासमोर हाफ-पँटवर पळताना उगाच संकोचायला होतं. "जय पी.टी. उषा, जय मिल्कासिंग" असं मनोमन म्हणत मी ताशी तीन-चार किलोमीटर्सच्या ‘वेगाने' पळायला सुरुवात केली. आणि हाय रे दुर्देवा, पहिल्याच दिवशी

निखळलेलं मोरपीस / १२९