पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचारतो, 'कोणतं ग?" मग ती म्हणते 'ते, रे, दूर अंतरावरुन जहाज येत असलं की जहाजाचा मधला भाग आधी दिसतो, वगैरे वगैरे. तसं बाबा लांबून यायला लागले की गोलमटोल पोट आधी दिसतं; नंतर बाबांचा चेहरा वगैरे वगैरे."

 आता माझी धर्मपत्नी दारावर आलेल्या भोवारणीला, भांडी घेताना, निमूटपणे जुने कपडे देईल तर काय बिघडेल काय? जुन्या पँटस् देताना हल्ली ह्यांच्या पोटाला होत नाहीत ना?" अशी अमूल्य माहिती कशाला पुरवत बसते? त्यामुळे उगीचच ती भोवारीण माझ्या पोटाकडे "कृतज्ञतेने" बघतेय असा मला भास होतो!

 मित्र तर काय विचारायलाच नकोत. कधी सरळ हाक मारतील तर शपथ. मि. पोटे काय, अरे पोट्या, अरे ढेरपोट्या ही काय सभ्य माणसांची हाक मारण्याची पद्धत झाली का? साधं विठोबा मंदिरापर्यंत फिरायला जायची गोष्ट. पण सगळ्यांची प्रेमळ चौकशी एकच. "अरे मि. पोटोबा आले का? ते आल्यावरच निघू. म्हटलंच आहे. आधी पोटोबा मग विठोबा !" आता आमचा भावंड्या. जिन्यावरून आपल्या ब्लॉककडे जाताना कधी सरळ जाईल का? प्रेमळपणे चौकशी केल्यासारखे दाखवेल; आणि जिन्यात एकदम मोठ्याने सांगेल, "अरे सांगायचं विसरलोच बघ. आज संध्याकाळी चांगलं व्याख्यान आहे. मी अभावितपणे विचारतो. "कशावर रे?" तो आणखी मोठ्यांदा सांगतो. "वाढत्या पोटाच्या समस्या."

 पण काय सांगू मित्रांनो, सगळ्यांच्या कुचेष्टा मी सहन केल्या. शिंपी म्हणाला, "साहेब, आता पँट अल्टर करता येणार नाय. सीटला आता मायाच उरली नाय." सगळे 'पोटभर' हसले. माझ्या पोटाचा बळी देऊन! पण एक दिवस माझ्या परमप्रिय नातवाने सुद्धा माझी चेष्टा केली. हो! चांगला त्याला शाळेतून आणायला गेलो होतो. वाटेत एक पावसाची सर आली म्हणून आडोशाला थांबलो. घरी आल्यावर मुलीने त्याचे डोकं चाचपून विचारलं. "सोन्या, भिजला कसा नाहीस?" तर हा माझा सोन्या सांगतो कसा? “अगं मम्मा, मी आजोबांच्या 'पोटाखाली' उभा होतो ना? श्रीकृष्णाने कसा गोवर्धन गिरी"..... . जय महाभारत. धन्य तो बी. आर. चोप्रा !" आमचे शहाणे बुजुर्ग म्हणत ते काही खोटं नाही. जावयाचं पोर; हरामखोर!"

 नातू म्हणजे मला प्राणांपलीकडे प्रिय असलेली एकमेव चीज; त्यानं पण माझी खिल्ली उडवावी? याच्या मला प्राणांतिक वेदना झाल्या. पण त्या प्रसंगानं मी अंतर्बाह्य ढवळून निघालो. तो माझा 'टर्निंग पॉईंट' ठरला.

 त्या दिवसापासून मी गंभीरपणे विचार करु लागलो. आपल्या 'पोटाचा' प्रश्न आपल्यालाच सोडवायला नको का? असं बालगंधर्वांच्या लडिवाळ सुरात स्वतःलाच विचारलं! अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यातून (म्हणजे नक्की कुठून, कुणास ठाऊक?)

पापी पोटाचा प्रश्न / १२८