पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 काही का असेना, रमाकांतच्या आग्रहाखातर मी 'हो' म्हणून गेलो खरा. त्याच्या मैत्रीचा दबाव की पैशाचा प्रभाव, यातील कोणत्या नेमक्या कारणाने मी होकार दिला, ते माझं मलाच कळलं नाही. मग आम्ही भिकूशेटच्या एअरकंडिशन ऑफिसात गेलो. त्याची दोन-तीनदा मुलाखत घेतली. त्याचे वेगवेगळे उद्योगसमूह बघितले. टिपणे तयार केली आणि एक छानपैकी लेख सजविला. रमाकांतने काय काय खटाटोप केला देव जाणे, पण जवळजवळ सर्व ठिकाणी त्याने लेखाला प्रसिद्धी मिळवून दिली. या लेखाचा खूप बोलबाला झाला. माझे कौतुक झाले. रमाकांत खुष झाला.

 'सर्वे गुणाः कांचनम् आश्रयन्ते' हेच खरं.

∗∗∗


 रात्री आठ वाजता आम्ही भिकूशेठच्या बंगल्यावर पोहोचलो. दाराशीच अंगावर फाटके-तुटके कपडे असलेले एक जोडपे उभे होते. बाईच्या हातात एक लहान मूल होतं. वर्ष-सव्वा वर्षाचं असावं. खूप रडून रडून निपचित पडलेलं दिसत होतं. बाई दीनवाणेपणाने रडत होती. नवरा केविलवाणेपणे उभा होता. भिकूशेठच्या मुकादमाकडे पैसे मागत होता. त्यांचा मुलगा आजारी दिसत होता. ताबडतोब हॉस्पिटलला न्यायचे होते. भिकूशेठच्या काम चाललेल्या एका मोठ्या बिल्डिंग कॉम्प्लेक्सवर दोघं नवरा- बायको मजूर म्हणून काम करत होती. 'आता काही पैसे द्या. हॉस्पिटलमध्ये मुलाला अॅडमिट करायचंय. नंतर आमच्या मजुरीतून पैसे कापून घ्या', असं ती दोघं त्या मुकादमाला डोळ्यात प्राण आणून सांगत होती. मुकादम त्यांना हाकलून लावत होता. शिव्या घालत होता. एवढ्यात भिकूशेठ बाहेर आला.

 “काय गडबड आहे रे?" मुकादमाने सगळे सांगितले. ती नवरा-बायको भिकूशेठच्या पायावर लोळण घ्यायला लागली, तेव्हा भिकूशेठ कडाडला, "चला चालते व्हा xxx ढोंग करतात. दारू ढोंसायची असेल. चला फुटा. काही पैसे-बिसे मिळायचे नाहीत."

 तरी ती नवरा-बायको दीनवाणेपणाने रडत-रडत 'मालक, दया करा' असं म्हणत भिकूशेठच्या पायावर पडायला लागली, तेव्हा त्याने फाडकन् नवऱ्याच्या मुस्कुटात मारली आणि म्हणाला,

 ‘थांबा xxx तुमच्या अंगावर आमच्या टायगरलाच सोडतो, म्हणजे तुमची तोंडे बंद होतील. दौलती, आपल्या टायगरची साखळी सोडा रे.'

 तेव्हा ती नवरा-बायको घाबरली. वाघासारखा भयानक तो टायगर मोकळा

निखळलेलं मोरपीस / ११