पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९. पापी 'पोटाचा' प्रश्न


 भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी गोवा भाग पारतंत्र्यात होता. पोर्तुगीजांच्या अमलाखाली होता. कुणीतरी गोव्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न पं. नेहरूंकडे उपस्थित केला तेव्हा ते हसून म्हणाले “अरे गोवा म्हणजे भारताच्या चेहेऱ्यावरची छोटीशी पुटकुळी आहे." पण नंतर गोवा - मुक्तीसाठी केवढं आंदोलन झालं; या छोट्याशा पुटकुळीचा केवढा मोठा 'नायटा' झाला हा इतिहास सगळ्यांना माहीत आहेच. सागायचं कारण म्हणजे माझं पोट! एकेकाळी माझ्या पोटाचा प्रश्न अवघा 'टीचभर' होता हो, पण बघता बघता हा प्रश्न 'पोटभर" झाला. सर्व शरीरात या बेट्या पोटानं आपलं स्वतंत्र राज्य प्रस्थापित केलं आहे. आता या 'प्रस्थापिता'चा नायनाट करण्यासाठी मला मोठं आंदोलन छेडायची वेळ आली आहे! गोव्यासारखा काट्याचा नायटाच झाला म्हणानात.

 लहान दिसणारं मूल पहाता पहातां केव्हा मोठं होतं ते कळत पण नाही. "अरे बाळ्या केवढा मोट्टा झाला? कालपर्यंत तर एवढासा पिटुकला होता." असे कौतुक ह्या बाळ्याच्या नशीबी असतं. पण माझं बिचारं टीचभर पोट बघता बघता केवढं 'मोठं' झालं याचं कौतुक तर सोडूनच द्या; पण बिचाऱ्याची सारखी टिंगल-टवाळी चालली आहे. हल्ली मला डायनिंग टेबलवर बसता येत नाही. पोटामुळे! माझ्या पोटाचा 'विस्तारवाद' आणि डायनिंग टेबलचा "जडवादी" स्वभाव, "अचल" वृत्ती, आपल्याच जागेवर 'ठाम' राहण्याचा हट्टीपणा, या संघर्षात मला जेवायला जमत नाही. पण त्याची हल्ली मला भलतीच शिक्षा मिळते! एखाद्या रोग्याला कसं "क्वारंटाईन'मध्ये टाकतात तसं मला बिनहाताच्या खुर्चीत बसवतात आणि समोर स्टूल ठेवून त्यावर माझं ताट असतं! त्यामुळं हिंदी सिनेमातून, टी. व्ही. सीरिअल्समधून आपण वाढून घ्यायचं, आपल्या गेस्टस्ना 'सर्व्ह' करायचा 'रुबाबदारपणा मला हल्ली दाखविता येत नाही! मुलगा म्हणतो “बाबा, तुम्हाला डायनिंग टेबल हवंच कशाला? आता काही दिवसातच मस्तपैकी थाळी पोटावरच ठेवून जेवता येईल. चहाचा कप ठेवता येईल. पोटाचं 'एक्स्टेंशन'च तुम्हाला डायनिंग टेबल म्हणून वापरता येईल! सेल्फ कंटेण्ड!" मुलगी म्हणते, आपली पृथ्वी गोल आहे ह्याची जी अनेक कारणं आम्ही लहानपणी भूगोलात वाचली त्यातलं एक कारण तुम्ही रस्त्यावरुन यायला लागलात की पटतं." मग जावई मुद्दाम

निखळलेलं मोरपीस / १२७