पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घट्ट धरून जात असल्याने पडायला मात्र होत नव्हतं. घारपुरे मॅडमना जिन्यातील एकसारख्या वळणामुळे घेरी आल्यासारखी वाटत होती. पण जगण्याची दुर्दम्य आशा सगळ्यांना पुढं पुढं रेटत होती.

 असं म्हणतात की सगळीकडून अंध:कार दिसायला लागला की परमेश्वर कुठून तरी प्रकाशाचा किरण दाखवतो...

 ओहो! खरंच प्रकाश दिसतोय की काय?

 शंकाच नको, चांगला उजेड दिसतोय,

 पुढची मंडळी एकदम ओरडली. "आला, ग्राऊंड फ्लोअर आला!”

 कोलंबसाला 'जमीन' दिसल्याचा आनंद काय होता याची एका क्षणात सगळ्यांना कल्पना आली.

 हळुहळू सर्वजण बिल्डिंगखाली आली. समोरच्या मोकळ्या जागेत प्रचंड गर्दी होती. फर्स्ट एड्चे सामान घेऊन, लिंबूपाण्याचे पेले घेऊन ऑफिसर्स लाऊंजचा स्टाफ उभा होता. कुणी तत्परतेने जाऊन केळी, बिस्किटे, खारे दाणे चणे मिळेल ते आणलं होतं. तिकडे अवघ्या मुंबईत माणसं, एकमेकांच्या उरावर बसून नरडीचे घोट घेत होती तेव्हा एकाच बँकेच्या छत्राखाली वावरणारी माणसं वीस वीस, पंचवीस पंचवीस जिने उतरत आलेल्यांना प्रेमानं मिठ्या मारत होती. सर्वांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहात होता.

 समोरच्या टॉवरच्या घड्याळात दुपारचे अडीच वाजले होते. वरून खाली यायला फक्त अर्धा तास, अवघी तीस मिनिटे ! पण युगं लोटली असं वाटलं.

 प्रत्येक सेकंद मरण्याच्या विचारातच घालवल्यानं सर्वांना पुनर्जन्म झाल्यासारखा वाटत होता.

 बँकेची आकाशात उंचवर गेलेली बिल्डिंग अजून तरी दिमाखात उभी होती. बॉम्ब ठेवल्याची अफवाच होती.

 अंधार यात्रा संपली होती. मात्र...

 एका मरणाच्या दारातून बाहेर पडलेली माणसं पुन्हा दुसऱ्या मरणाच्या दारात प्रवेश करायला सज्ज होत होती!

अंधारयात्रा / १२६